निपाणी नगरी वृत्तसेवा (10)
निपाणी तालुक्यातील पट्टणकुडी हद्दीतील दाईंगडे मळा येथे प्रधानमंत्री आवास योजनेतून बांधण्यात आलेल्या ‘जी प्लस-२’ घरांचे वाटप केवळ गरजू व सर्वसामान्य लाभार्थ्यांनाच व्हावे, यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून जुनी सदोष यादी दुरुस्त करण्यास भाग पाडले. विद्यमान आमदार व माजी खासदारांनी ड्रॉ पद्धतीने घातलेला चुकीचा घाट आम्ही सर्वसामान्यांच्या हितासाठी हाणून पाडला, अशी माहिती चिकोडी जिल्हा काँग्रेस व ‘बुडा’ अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी दिली.
येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकु पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
चिंगळे पुढे म्हणाले की, २० मे रोजी झालेल्या घरकुल वितरण गोंधळामुळे लाभार्थ्यांमध्ये गैरसमज पसरला आहे. मात्र, आम्ही कोणाचेही घर हिसकावून घेतलेले नाही. ज्या मूळ लाभार्थ्यांनी पैसे भरले आहेत, त्या सर्वांचा यादीत समावेश व्हावा हीच आमची भूमिका होती. या प्रकरणी आम्ही सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.
डोळ्यात तेल घालून काम करा; कार्यकर्त्यांना आवाहन:
प्रशासनाने आता १ हजार १२ लाभार्थ्यांची सुधारित यादी फलकावर प्रसिद्ध केली असून, सध्या लाभार्थ्यांच्या बँक पावत्यांची व वैयक्तिक माहितीची (सर्व्हे) पडताळणी सुरू आहे. या योजनेत केवळ ४ हप्ते भरलेल्या आणि खऱ्या पात्र उमेदवारांनाच घरकुलाचा लाभ मिळावा, यासाठी तपास पथके कार्यरत आहेत. दि. १२ जूनपर्यंत यावर हरकती मागविल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी या सर्व्हेदरम्यान डोळ्यात तेल घालून काम करावे. शेजारील लाभार्थी गडगंज असल्यास किंवा अपात्र असल्यास त्याची तक्रार नोंदवावी, जेणेकरून विनाविलंब अंतिम पारदर्शक यादी तयार होऊन मूळ लाभार्थ्याला हक्काचे घर मिळेल, असे आवाहन चिंगळे यांनी शेवटी केले.