निपाणी नगरी वृत्तसेवा (10)
कर्नाटकातील सहकार क्षेत्रात अग्रेसर, कर्नाटक राज्य संयुक्त सहकारी नियमित, बंगळुरू मधील नामवंत आणि बेळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध संस्था ‘श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित, निपाणी’ या संस्थेने बुधवार, दिनांक १०/०६/२०२६ रोजी ७०० कोटी ठेवींचा टप्पा पार करून ८०० कोटी ठेवींकडे वाटचाल केली आहे.
समाजामध्ये एकी नांदावी तसेच समाजाचे आर्थिक हित जोपासले जावे, या उद्देशाने सहकार रत्न व संस्थापक चेअरमन डॉ. सी. बी. कुरबेट्टी यांच्या पुढाकाराने श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेची स्थापना १९९१ मध्ये झाली. या संस्थेने हजारो कुटुंबांना आर्थिक मदतीचा आधार देऊन त्यांच्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल घडवण्याचे मोठे काम केले आहे; यामुळेच संस्थेकडे ठेवींचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे. ठेवीदार आणि सभासद यांचा विश्वास संस्थेने जिंकलेला असल्यामुळे महात्मा बसवेश्वर संस्थेची प्रगतीची घोडदौड वेगाने सुरू आहे.
डॉ. सी. बी. कुरबेट्टी म्हणाले की, ‘विना सहकार नाही उद्धार’ या संकल्पनेनुसार विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजेच १९८० ते ९० च्या दशकामध्ये सहकारी चळवळीतून निपाणी व निपाणी परिसरामध्ये एक सामाजिक बांधिलकी जपली जावी, समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा आणि समाजामध्ये एकी नांदावी, असा उदात्त हेतू व उद्दिष्ट घेऊन अनेक सहकारी संस्था स्थापन झाल्या. परंतु, काळाच्या ओघात काही संस्थांना तो हेतू व उद्दिष्ट जपता आले नाही. त्यामुळे अनेक संस्था लोप पावल्या; तर काही संस्थांनी आपले हेतू व उद्दिष्ट जपल्यामुळे आज त्या मोठ्या नावारूपाला आल्या आहेत. त्यामध्ये आपली निपाणीची श्री महात्मा बसवेश्वर संस्था आज संपूर्ण राज्यामध्ये अग्रेसर आहे.
संस्थेने नेहमीच सामाजिक हित जोपासले आहे. समाजामध्ये ज्या ज्या वेळी सामाजिक, आर्थिक व नैसर्गिक संकटे निर्माण झाली, त्यावेळी संस्थेने आपल्या परीने सभासद, कर्जदार, ठेवीदार आणि ग्राहक यांना वेळोवेळी मोलाची मदत केली आहे. आज सहकारामुळे ग्रामीण भागाचा चेहरा बदलला आहे. लोकांना आर्थिक स्थैर्य मिळाल्यामुळे उद्योगधंदे, शेती, व्यापार आणि शिक्षण वाढीस चालना मिळाली आहे, तसेच रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे कामही संस्थेने केले आहे. परिणामी, ग्रामीण भागातील नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावला आहे.
संस्थेच्या सुरुवातीच्या स्थापनेच्या काळामध्ये रुपये ७ लाखांच्या ठेवी होत्या, त्या आज ७०० कोटी ठेवींचा टप्पा ओलांडून ८०० कोटींकडे वाटचाल करीत आहेत. आज संस्थेच्या ३५ शाखा असून संस्थेकडे ६०००० सभासद संख्या आहे. तसेच दिनांक ३१/०३/२0२६ अखेर शेअर कॅपिटल १ कोटी ५७ लाख ८२ हजार, स्वनिधी ८६ कोटी ६५ लाख, सुरक्षित गुंतवणूक ३१८ कोटी ३४ लाख, कर्ज वितरण ४८० कोटी, खेळते भांडवल ८२५ कोटी ६९ लाख, एकूण उलाढाल ४७०० कोटी व नफा १० कोटी ६९ लाख झाल्याचे त्यांनी सांगितले. आज संस्था सहकाराचे शताब्दी वर्ष साजरे करीत आहे.
संस्थेचे निस्वार्थी व पारदर्शक संचालक मंडळ, कुशल व तज्ञ कष्टाळू कर्मचारी वर्ग, तसेच विश्वासू सभासद, कर्जदार, ठेवीदार आणि हितचिंतक यांच्यामुळेच संस्थेची ही उल्लेखनीय प्रगती सुरू आहे.
या कार्यक्रमास चेअरमन किशोर बाली, संचालक डॉक्टर एस. आर. पाटील, श्रीकांत परमणे, प्रताप पट्टनशेट्टी, महेश बागेवाडी, अशोक लिगाडे, सुरेश शेट्टी, दिनेश पाटील, राजेश पाटील, संचालिका पुष्पा कुरबेट्टी, विजया शेट्टी, सुवर्णा पट्टणशेट्टी, सीईओ एस. के. आदन्नावर व असंख्य कर्मचारी उपस्थित होते.