निपाणी नगरी वृत्तसेवा (14) मूरगुड प्रतिनिधी
“तरुणाईला नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या प्रवृत्ती ठेचून काढण्याची वेळ आली आहे! समाजातील शांतता आणि तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या अमली पदार्थ तस्करांविरोधात आता केवळ गुन्हे दाखल करून चालणार नाही, तर या छुप्या विषारी विळख्याची पाळेमुळे मुळासकट उखडून टाकावी लागतील. कोल्हापूर पोलिसांनी केलेली ही कारवाई कौतुकास्पद असली, तरी आपल्या आजूबाजूला चालणाऱ्या अशा काळ्या धंद्यांविरोधात सजग नागरिकांनीही आता कठोर भूमिका घेण्याची तीव्र गरज निर्माण झाली आहे.”
मुरगुड: अमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक मा. श्री. निलोत्पल यांनी दिले होते. या आदेशानुसार मुरगुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलीस अंमलदार राहुल केणे यांना एक गोपनीय बातमी मिळाली. मुरगुड येथील डोंबारी गल्लीत राहणारा रवी राजू डोंबारी याने आपल्या घरात विक्रीसाठी गांजा आणून ठेवल्याची खात्रीशीर माहिती मिळताच, पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने पहाटेच्या सुमारास त्याच्या घरावर छापा टाकला.
या छाप्यात रवी डोंबारी याच्या घरातून ४७,५२० रुपये किमतीचा १ किलो १८४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. तसेच, त्याच्या ताब्यातील विना-नंबरप्लेटच्या स्प्लेंडर मोटारसायकलच्या मडगार्डजवळ लपवून ठेवलेला १३,६८० रुपये किमतीचा ३४ ग्रॅम गांजाही पोलिसांनी शोधून काढला.
धक्कादायक बाब म्हणजे, अटक करण्यात आलेल्या रवी डोंबारी याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने हा गांजा मुरगुडमधील भोई गल्लीत राहणाऱ्या विजय विलास भोई याच्याकडून विकत घेतल्याचे कबूल केले. पोलिसांनी तत्परता दाखवत पहाटे २:२० वाजण्याच्या सुमारास विजय भोई याच्या घरावरही दुसरा छापा टाकला. या कारवाईत त्याच्या घरातून १४,८०० रुपये किमतीचा ३७० ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला.
या दोन्ही कारवायांमध्ये एकूण १ किलो ५९२ ग्रॅम गांजा (किंमत ६३,६८० रुपये), गुन्ह्यात वापरलेली ३५,००० रुपये किमतीची स्प्लेंडर मोटारसायकल आणि १२,००० रुपये किमतीचे दोन मोबाईल हँडसेट असा एकूण १,१०,६८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी रवी राजू डोंबारी (वय ३०) आणि विजय विलास भोई (वय २७) या दोघांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना १६ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
तपासात तिसऱ्या आरोपीचे नाव निष्पन्न; त्यालाही बेड्या पोलिसांनी या गुन्ह्याचा पुढील तपास केला असता, या रॅकेटचे धागेदोरे आणखी पुढे गेले. अटक करण्यात आलेला दुसरा आरोपी विजय भोई याने हा गांजा हातकणंगले तालुक्यातील तळंदगे येथील रहिवासी शिवाजी पोपट शिंगाडे याच्याकडून खरेदी केल्याचे समोर आले. पोलिसांनी तात्काळ पावले उचलत शिवाजी पोपट शिंगाडे यालाही या गुन्ह्यात आरोपी करून १३ जून २०२६ रोजी सायंकाळी अटक केली आहे.
ही यशस्वी कारवाई कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक मा. श्री. निलोत्पल आणि करवीर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मा. सुजीतकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली मुरगुड पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती क्रांती पाटील, सहायक फौजदार प्रशांत गोजारे, पोलीस हवालदार बजरंग पाटील, अमर पाटील, सुनील देसाई, विलास पाटील आणि पोलीस अंमलदार राहुल केणे, खुशाल शिंदे, प्रफुल्ल कांबळे यांच्या पथकाने केली आहे. या धडक कारवाईमुळे परिसरात अमली पदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.