निपाणी नगरी वृत्तसेवा (13)
कला आणि भक्तीचा एक अद्भूत संगम निपाणी नगरीत पाहायला मिळत असून येथील सुवर्ण कारागिरीने एक नवा इतिहास रचला आहे. बागलकोट जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान असलेल्या बदामी येथील श्री बनशंकरी देवी मंदिरासाठी निपाणीमध्ये तब्बल १५० किलो चांदीचा भव्य रथ आणि १० किलो वजनाची आकर्षक चांदीची मूर्ती साकारण्यात आली आहे. निपाणीतील नामांकित सुवर्ण व्यावसायिक ‘अपय्या शिवरुद्रप्पा शेट्टी ज्वेलर्स’ यांच्या कुशल कारागिरांनी आपल्या अफाट कौशल्याच्या जोरावर हे अत्यंत कलात्मक काम पूर्ण केले असून, यामुळे निपाणीच्या वैभवात मोलाची भर पडली आहे.
बनशंकरी देवी मंदिर समितीने या महत्त्वाकांक्षी आणि पवित्र प्रकल्पाची संपूर्ण जबाबदारी शेट्टी ज्वेलर्स यांच्याकडे सोपवली होती. मंदिर समितीने उपलब्ध करून दिलेल्या चांदीचा अत्यंत योग्य आणि कलात्मक वापर करत कारागिरांनी हा देखणा, नक्षीदार आणि पारंपरिक शैलीतील रथ तयार केला आहे. यासोबतच देवीची १० किलो वजनाची देखणी चांदीची मूर्तीही घडविण्यात आली आहे. हा भव्य रथ आणि मूर्ती साकारण्यासाठी तब्बल सहा महिन्यांचा प्रदीर्घ कालावधी लागला असून, एकूण २५ कुशल कारागिरांनी दररोज सुमारे १० तास अविरत परिश्रम घेऊन हे सुंदर रूप प्रत्यक्षात आणले आहे.
रथाचे काम पूर्ण झाल्यानिमित्त निपाणीत एका विशेष पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी निपाणी समाधी मठाचे प्राणलिंग स्वामी प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी या रथाचे आणि मूर्तीचे दर्शन घेऊन कारागिरांच्या अद्भूत कौशल्याचे आणि त्यांच्या कष्टाचे भरभरून कौतुक केले. हा ऐतिहासिक रथ आणि मूर्ती येत्या बुधवार दिनांक १७ रोजी मूळ मंदिरात नेण्यात येणार असून, तिथे विधीवत रथाची व मूर्तीची भव्य प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे.
या मंगलमयी रथपूजन सोहळ्याला शेट्टी ज्वेलर्सचे सुरेश शेट्टी, रवींद्र शेट्टी, आदित्य शेट्टी, कार्तिक शेट्टी यांच्यासह डॉ. सी. बी. कुरबेट्टी, अमर बागेवाडी, महालिंगेश कोठीवाले, शिवानंद पुराणीकमठ, डॉ. एस. आर. पाटील, राजू वाळवे, प्रताप पटणशेट्टी, गीता पाटील, ललिता शेट्टी, सविता शेट्टी, रश्मी शेट्टी, शेट्टी ज्वेलर्सचे सर्व कारागीर कर्मचारी महिलावर्ग यांच्यासह निपाणी नगरीतील असंख्य नागरिक आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अभूतपूर्व कामगिरीमुळे संपूर्ण निपाणी परिसरात आनंदाचे आणि कौतुकाचे वातावरण निर्माण झाले आहे.