निपाणी नगरी वृत्तसेवा (26)
अर्जुननगर : छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीमुळे समाजात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचा खऱ्या अर्थाने विकास झाला. आपले संपूर्ण राजेपण समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी खर्च करणारे पुरोगामी विचारांचे एकमेव राजे म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज होत, असे प्रतिपादन प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. रमेश साळुंखे यांनी केले.
जनता शिक्षण मंडळ संचलित देवचंद महाविद्यालय, अर्जुननगर येथे आयोजित १४२ व्या राजर्षी शाहू महाराज जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी शाहू महाराजांनी दीन-दलित, वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. कला, क्रीडा, संस्कृती, शिक्षण आणि शेती या क्षेत्रांना राजाश्रय देऊन त्यांनी बहुजन समाजाच्या विकासाला चालना दिली. सामाजिक समता निर्माण करणारे लोककल्याणकारी राजे म्हणून राजर्षी शाहू महाराजांकडे आजही आदराने पाहिले जाते, असे त्यांनी सांगितले.
यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अशोक डोनर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आजच्या तरुण पिढीने राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा जागर करून ते घराघरांत पोहचविण्याची गरज आहे. नव्या पिढीला शाहू महाराजांनी केलेल्या सामाजिक, शैक्षणिक आणि लोककल्याणकारी कार्याची ओळख करून देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.यावेळी प्रा. नानासाहेब जामदार यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याविषयी आपले विचार व्यक्त केले. ग्रंथालया तर्फे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या विषयीचे ग्रंथलेखन प्रदर्शित केले.
या उपक्रमाला जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री आशिषभाई शाह, उपाध्यक्षा डॉ. सौ. तृप्तीभाभी शाह तसेच संस्थेचे खजिनदार श्री सुबोधभाई शाह यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी डॉ. पी. बी. शिलेदार प्रा. शिवाजी कुंभार ,कबीर वराळे, श्री संतोष प्रधान, श्री श्रीकांत मतकरी, श्री रणजीत कोळी, मारुती नाईक, श्री माने तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.