निपाणी नगरी वृत्तसेवा (27)
मराठा मंडळ संचलित मराठी विद्यानिकेतन प्राथमिक शाळा, निपाणी येथे शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी विद्यार्थ्यांच्या शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध व लोकशाही पद्धतीने पार पडली.
मराठा मंडळाचे अध्यक्ष रवींद्र रघुनाथराव कदम, मराठा मंडळ शिक्षण समितीचे चेअरमन राजेश रघुनाथराव कदम तसेच मार्गदर्शिका संगीता रवींद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मराठा मंडळ शिक्षण समितीच्या संचालिका सौ. ज्योती राजेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला.
निवडणूक प्रक्रियेची सुरुवात सौ. ज्योती राजेश कदम यांच्या हस्ते मतदान पेटीचे पूजन करून करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी मतदानाचे महत्त्व, लोकशाही व्यवस्थेतील नागरिकांची जबाबदारी, मतदान हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आणि कर्तव्य असल्याचे सांगितले. निवडणुकीत विजय-पराजय हा लोकशाही प्रक्रियेचा अविभाज्य भाग असून निकाल कोणाच्याही मनात कटुता निर्माण करणारा नसावा, तर परस्पर सन्मान, सहकार्य आणि संघभावना जपणे हीच खरी लोकशाही असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. निवडणूक ही केवळ प्रतिनिधी निवडण्याची प्रक्रिया नसून जबाबदार नेतृत्व, प्रामाणिकपणा, शिस्त, पारदर्शकता आणि सामाजिक बांधिलकी यांचे शिक्षण देणारे प्रभावी माध्यम असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या निवडणुकीमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी, विद्यार्थिनी प्रतिनिधी तसेच क्रीडा, सांस्कृतिक, सहल, आरोग्य, शिस्त आदी विविध खात्यांसाठी निवडणुका घेण्यात आल्या. निवडणुकीपूर्वी उमेदवारांनी उत्साहपूर्ण प्रचार केला. प्रचाराची रंगत शिगेला पोहोचल्यानंतर इयत्ता चौथी ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी मतदान प्रक्रियेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून गुप्त मतदान पद्धतीने आपला मतदानाचा हक्क बजावला.
मतदानासाठी अधिकृत मतदार यादी, मतदान केंद्र, मतदान अधिकारी, बॅलेट पेपर, मतदान पेटी, गुप्त मतदान कक्ष अशा सर्व बाबींची योग्य व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लोकशाही निवडणूक प्रक्रिया अनुभवण्याची आणि मतदानातील पारदर्शकतेचे महत्त्व समजून घेण्याची संधी मिळाली.
संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि पारदर्शक वातावरणात पार पडली. ही निवडणूक यशस्वी करण्यासाठी मराठा मंडळ संचलित बालवाडी व मराठी विद्यानिकेतन प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियोजित वेळेनुसार मतमोजणी करण्यात येणार असून त्यानंतर विविध पदांसाठी विजयी उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती शाळेच्या वतीने देण्यात आली.