निपाणी नगरी वृत्तसेवा (11)
निपाणी टाऊन प्लॅनिंग कमिटीचे अध्यक्ष संयोजित उर्फ निकु पाटील यांचा ४८ वा वाढदिवस सामाजिक बांधिलकी, धार्मिक उपक्रम आणि राजकीय स्नेहाच्या वातावरणात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या स्नेहमिलन कार्यक्रमाप्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून निकु पाटील यांना उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले बेळगाव जिल्हा प्राधिकरणाचे अध्यक्ष (बुडाध्यक्ष) माननीय लक्ष्मणराव चिंगळे यांनी निकु पाटील यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा गौरव करत आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, “निकु पाटील यांनी आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत ‘कृषिधन दूध संस्थे’च्या माध्यमातून डेरी व्यवसायाला अत्यंत सक्षम आकार दिला आहे. कोरोनाच्या अत्यंत कठीण काळात त्यांनी दाखवलेली सामाजिक दातृत्वभावना, ‘दौलतराव सोशल फाउंडेशन’ व ‘हेल्थ क्लब’च्या माध्यमातून राबवलेले आरोग्यविषयक उपक्रम, आणि पायी दिंडीतील त्यांचा उत्स्फूर्त सहभाग या सर्व गोष्टी त्यांच्या संवेदनशील स्वभावाची साक्ष देतात. गणेश चतुर्थीच्या काळात पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आपल्या खाजगी जागेत टँक उभारून त्यांनी केलेले जलप्रदूषण मुक्तीचे व निर्माल्य विसर्जनाचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. आपले आजोबा कै. दौलतराव पाटील यांचा सामाजिक व सांस्कृतिक वसा आणि वारसा समर्थपणे जपत त्यांनी ज्येष्ठ-श्रेष्ठ कीर्तनकार व प्रवचनकारांच्या माध्यमातून अखंड कीर्तनसेवा घडवून आणली आहे. मागील पाच वर्षांपासून ते भव्य क्रिकेट स्पर्धांचे यशस्वी आयोजन करत असून ‘जायंट्स ग्रुप’च्या माध्यमातूनही त्यांचे कार्य सातत्याने सुरू आहे. मैत्रीच्या दुनियेतील हा सच्चा आणि ‘राजा माणूस’ असून, त्यांच्या ऊर्जादायी व्यक्तिमत्त्वाने नेहमीच इतरांना प्रेरणा दिली आहे.”
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मलाबादे सर यांनी उपस्थित सर्व पाहुण्यांचे सहर्ष स्वागत केले, प्रास्ताविक मांडले आणि शेवटी उपस्थितांचे आभारही मानले.
या सोहळ्याला बेळगाव जिल्हा प्राधिकरण अध्यक्ष श्री लक्ष्मणराव चिंगळे सर, चिकोडी जिल्हा उपाध्यक्ष श्री रोहन साळवे, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, माजी नगराध्यक्ष पप्पूअण्णा चव्हाण, चंद्रकांत जासूद, किरण कोकरे, दिलीप पठाडे, रवी इंगवले, झाकीर कादरी, आर के दिवाकर,रणजीत मगदूम, बबन निर्मले, कृष्णात कुंभार, वसंत धारव यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर, नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.