निपाणी नगरी वृत्तसेवा (23)
कोगनोळी येथील इंटरनॅशनल पब्लिक स्कूल व आर्ट्स प्रि मिलिटरी कॉलेज व युवा सायन्स अकॅडमी या संकुलात अनिवासी विद्यार्थ्यांची पालक सभा संपन्न झाली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव कुमार पाटील हे होते. तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेच्या अध्यक्षा रेखा पाटील, प्राचार्य अनमोल पाटील व मुख्याध्यापिका कोमल पाटील हे उपस्थित होते. प्रारंभी या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक वर्षा कांबळे यांनी केले. नंतर उपस्थित मान्यवरांच्या अमृत हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा स्वागत सत्कार करण्यात आला. यानंतर आषाढी एकादशी निमित्त पालकांसाठी घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. यानंतर प्राचार्य अनमोल पाटील यांनी मार्गदर्शन मुलांच्या आयुष्यात शिक्षक आणि पालक हे दोन आधारस्तंभ आहेत. शिक्षक ज्ञान , शिस्त आणि दिशा देतात तर पालक प्रेम, संस्कार आणि आत्मविश्वास देतात. या दोघांच्या प्रयत्नांची सांगड घातली, तर मुलांच्या यशाचा मार्ग नक्कीच सुकर होतो अशी भावना व्यक्त केली . यानंतर संस्थेचे सचिव कुमार पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना आपण मुलांना महागड्या वस्तू देण्यापेक्षा आपला वेळ, आपले लक्ष आणि आपले संस्कार दिले, तर त्यापेक्षा मोठी संपत्ती त्यांच्या आयुष्यात दुसरी कोणतीही नाही असे सांगितले. यानंतर एलकेजी ते पहिली पर्यंतच्या पालकांची मातीपासून नाग बनवणे स्पर्धा तर दुसरीपासून पाचवीपर्यंतच्या पालकांचा छत्री सजावट स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत अनेक पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. यावेळी संकुलातील सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता दिवटे यांनी केले तर आभार प्रतिक्षा काटवाळे यांनी मानले.