निपाणी नगरी प्रतिनिधी :
एरंडपे पैकी धनगरवाडा, ता. भुदरगड येथील शाळेत कार्यरत असलेले बोरवडे गावचे शिक्षक पांडुरंग चव्हाण यांनी आपल्या सेवाभावातून आणि सामाजिक बांधिलकीतून एक आदर्श निर्माण केला आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक वातावरण मिळावे आणि शाळेचा परिसर अधिक सुंदर व सुरक्षित व्हावा, या उद्देशाने त्यांनी स्वतःच्या खर्चातून शाळेच्या विकासासाठी पुढाकार घेतला आहे.
विशेष म्हणजे धनगरवाडा येथील शाळेत जाण्यासाठी आजही व्यवस्थित रस्ता उपलब्ध नाही. तब्बल २.५ किलोमीटर अंतर जंगलातून पायपीट करून शाळेत पोहोचावे लागते. अशा प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षक पांडुरंग चव्हाण यांनी आपल्या कर्तव्यापासून माघार न घेता शाळेच्या विकासासाठी अथक प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्यांनी स्वखर्चातून शाळेला कंपाऊंड वॉल करून घेतली असून शाळेची रंगरंगोटी करून परिसराला आकर्षक स्वरूप दिले आहे. तसेच शाळेचे पटांगणही व्यवस्थित करून घेतले आहे.
१५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणासाठी विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून झेंडावंदनाचा कट्टाही उभारण्यात आला. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकातील शिक्षण न देता श्रमाचे महत्त्व, शाळेविषयी आपुलकी आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी, या दृष्टिकोनातून हा उपक्रम विशेष कौतुकास्पद ठरला आहे.
दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी काम करताना अडचणींचा विचार न करता स्वतःचा वेळ, श्रम आणि पैसा खर्च करून शाळेचा विकास करणारे शिक्षक पांडुरंग चव्हाण यांचे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांच्या या जिद्दीला, कष्टाला आणि सामाजिक बांधिलकीला पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांकडून कौतुकाची दाद मिळत असून, अशा शिक्षकांच्या कार्याला समाजाने प्रोत्साहन देणे हीच त्यांच्यासाठी खरी पावती ठरेल.