निपाणी नगरी वृत्तसेवा (5)
भारताचे महान तत्त्वज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, माजी राष्ट्रपती आणि आदर्श शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती तसेच शिक्षक दिन निपाणी मराठा मंडळ हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात, आनंदात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रा. ॲड. डी. डी. हळवणकर सर होते. प्रारंभी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. ॲड. डी. डी. हळवणकर सर म्हणाले की, “शिक्षक हा केवळ विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान देणारा व्यक्ती नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणारा शिल्पकार असतो. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास, संस्कार, शिस्त, देशप्रेम आणि माणुसकीची भावना निर्माण करण्याचे महान कार्य शिक्षक करत असतो. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते हे केवळ वर्गखोलीपुरते मर्यादित नसून ते आयुष्यभराचे असते.”
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्याचा उल्लेख करताना ते पुढे म्हणाले की, “देशाचे राष्ट्रपतीपद भूषवूनही डॉ. राधाकृष्णन यांनी स्वतःची ओळख एका शिक्षकाच्या भूमिकेतूनच अधिक अभिमानाने जपली. त्यांच्या कार्यातून शिक्षक समाजाला मिळणारा सन्मान आणि शिक्षकाची जबाबदारी अधोरेखित होते. शिक्षक दिन हा केवळ शुभेच्छा देण्याचा दिवस नसून शिक्षकांनी आपल्या कार्याचा आत्मपरीक्षण करण्याचा आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आणखी समर्पित होण्याचा दिवस आहे.”
आजच्या बदलत्या युगात शिक्षण क्षेत्रासमोर अनेक नवीन आव्हाने आहेत. तंत्रज्ञान, मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे विद्यार्थ्यांचे जग झपाट्याने बदलत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासक्रम शिकविणे पुरेसे नसून त्यांना चांगला माणूस, जबाबदार नागरिक आणि संवेदनशील व्यक्ती म्हणून घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे.
“शाळा म्हणजे केवळ चार भिंतींची इमारत नाही. शाळा म्हणजे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आकार देणारे संस्कारकेंद्र आहे आणि शिक्षक हा त्या संस्कारकेंद्राचा आधारस्तंभ आहे. एखाद्या विद्यार्थ्याच्या जीवनात शिक्षकाने दिलेली एक छोटीशी प्रेरणा त्याचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते. त्यामुळे प्रत्येक शिक्षकाने प्रत्येक विद्यार्थ्याकडे केवळ विद्यार्थी म्हणून नव्हे, तर भविष्यातील नागरिक म्हणून पाहिले पाहिजे.”
यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना “मोठे होण्यापेक्षा चांगले माणूस होणे महत्त्वाचे आहे”, असा संदेश दिला. शिक्षणाबरोबरच शिस्त, संस्कार, प्रामाणिकपणा, परिश्रम, वेळेचे नियोजन आणि सामाजिक जबाबदारी यांना जीवनात महत्त्व द्यावे, असे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले.
कार्यक्रमामध्ये शिक्षक दिनाचे महत्त्व, डॉ. राधाकृष्णन यांचे शैक्षणिक व सामाजिक योगदान आणि शिक्षकांची समाज घडविण्यातील भूमिका यावर विचार व्यक्त करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेत शिक्षकांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.
“आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरिक आहे आणि त्या नागरिकाच्या व्यक्तिमत्त्वाची पायाभरणी शिक्षक करतो. त्यामुळे शिक्षकाचा प्रत्येक शब्द, प्रत्येक कृती आणि प्रत्येक संस्कार विद्यार्थ्याच्या आयुष्यावर परिणाम करणारा असतो,” असे प्रतिपादन मुख्याध्यापक प्रा. ॲड. डी. डी. हळवणकर सर यांनी केले.
यावेळी व्ही. व्ही. पत्की, एस. डी. साखळकर, जे. आर. खपले, ए. एम. यादव, के. एल. कांबळे, के. एस. देसाई, अर्चना पाटील, पूजा पाटील, प्रियांका पाटील, धनश्री पाटील, एस. बी. चौगले, लेखनिक मुकुंद कोरे, रेणुका फराकटे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.