निपाणी नगरी वृत्तसेवा (31)
या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक ॲड. उदय जिनगे यांनी विद्यार्थ्यांना POCSO कायदा (बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा), बालकामगार प्रतिबंधक कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा यांची सविस्तर माहिती दिली. तसेच बालकांचे मूलभूत हक्क, शिक्षणाचा अधिकार, बालकांसाठी असलेल्या आरक्षणाच्या तरतुदी, शासकीय सुविधा व कायदेशीर संरक्षण याविषयी मार्गदर्शन केले.
बालकांचे शोषण, बालकामगार प्रथा, बालविवाह आणि लैंगिक अत्याचार यांसारख्या सामाजिक समस्यांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. कोणत्याही अनुचित प्रसंगात न घाबरता पालक, शिक्षक किंवा संबंधित यंत्रणेकडे मदत मागावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ. राकेश तावदारे होते. यावेळी व्ही. डी. इंदलकर, टी. ए. घोसारवाडे, एस. डी. खोत आणि टी. ए. देसाई उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. बी.कळंत्रे यांनी केले, तर आभार प्रदर्शन एस. डी. खोत यांनी केले.
विद्यार्थ्यांना कायद्याचे ज्ञान मिळून स्वतःच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि सुरक्षित समाज निर्मितीसाठी त्यांच्यात जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने आयोजित केलेला हा उपक्रम उपयुक्त ठरला.