निपाणी नगरी वृत्तसेवा (1)
येथील मराठा मंडळ हायस्कूलमध्ये रविवार, दिनांक १ नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्योत्सव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कर्नाटकची आराध्य देवता श्री भुवनेश्वरी मातेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यानंतर शाळेचे मुख्याध्यापक प्रा. ॲड. डी. डी. हळवणकर यांनी आपल्या मनोगतातून कर्नाटक राज्याची स्थापना, ऐतिहासिक पार्श्वभूमी, भौगोलिक वैशिष्ट्ये, निसर्गसंपदा, सांस्कृतिक वैभव, साहित्यिक परंपरा, ऐतिहासिक वारसा तसेच शैक्षणिक, औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
कर्नाटक राज्याला लाभलेली सुमारे ३४३ किलोमीटर लांबीची समुद्रकिनारपट्टी, पश्चिम घाटाच्या पर्वतरांगा, कृष्णा, कावेरी, तुंगभद्रा यांसारख्या नद्या, हम्पी, बदामी, ऐहोळे यांसारखी ऐतिहासिक स्थळे आणि बेंगळुरूसारखे जागतिक स्तरावर ओळखले जाणारे तंत्रज्ञान केंद्र या राज्याच्या वैभवात भर घालतात, असे त्यांनी सांगितले. कन्नड भाषेची प्राचीनता, समृद्ध साहित्य परंपरा आणि तिला प्राप्त झालेला अभिजात भाषेचा दर्जा यांचे महत्त्व विशद करत विद्यार्थ्यांनी कन्नड भाषेवर मनापासून प्रेम करावे, तिचे शुद्ध वाचन, लेखन आणि संभाषण आत्मसात करावे तसेच कन्नड भाषेचा अभिमान बाळगावा, असे आवाहन त्यांनी केले. कर्नाटकच्या प्रगतीमध्ये प्रत्येक नागरिकाने आपापल्या परीने योगदान देऊन राज्याचे नाव उज्ज्वल करावे, असा प्रेरणादायी संदेशही त्यांनी दिला.
यानंतर शाळेतील कन्नड शिक्षिका पत्की यांनी आपल्या मनोगतातून कन्नड भाषेचे महत्त्व, तिची समृद्ध साहित्यिक परंपरा, कन्नड साहित्यिकांचे योगदान आणि कर्नाटकच्या गौरवशाली सांस्कृतिक वारशाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी कन्नड भाषेचे नियमित वाचन करावे, भाषेतील शब्दसंपत्ती वाढवावी आणि दैनंदिन व्यवहारात कन्नड भाषेचा आत्मविश्वासाने वापर करावा, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना कर्नाटक राज्याचा गौरवशाली इतिहास, भौगोलिक संपन्नता, सांस्कृतिक परंपरा आणि कन्नड भाषेचे महत्त्व जाणून घेण्याची संधी मिळाली.
या कार्यक्रमाला एस. डी. साखळकर, जे. आर. खपले, ए. एम. यादव, के. एल. कांबळे, के. एस. देसाई, अर्चना पाटील, पूजा पाटील, प्रियांका पाटील, धनश्री पाटील, एस. बी. चौगले, लेखनिक मुकुंद कोरे, रेणुका फराकटे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.