निपाणी नगरी वृत्तसेवा (31)
मराठा मंडळ बेळगाव, संचलित मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आज शनिवार ३१ रोजी विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि कायदेविषयक जाणीव याबद्दल मार्गदर्शन कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेमध्ये JMFC निपाणी चे न्यायाधीश श्री. दत्तकुमार जवळकर यांनी विद्यार्थ्यांना POCSO – Protection of Children from Sexual Offences कायद्याविषयी बहुमूल्य मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना ‘पोक्सो’ कायद्याचा मूळ उद्देश आणि बालकांच्या संरक्षणा संदर्भातील कायदेशीर तरतुदी सांगितल्या. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी कशी घ्यावी, कोण-कोणते स्पर्श सुरक्षित आहेत आणि कोणता स्पर्श चुकीचा किंवा संशयास्पद वाटल्यास ताबडतोब सतर्क व्हावे, याचे सविस्तर धडे दिले. जर कोणालाही असा वाईट अनुभव आला तर घाबरून न जाता तात्काळ आपल्या पालकांना व शिक्षकांना सांगावे, असे आवाहन केले.
ॲड.श्याम पाटील आणि ॲड. गणेश गोंधळी यांनी बालविवाहाचे अल्पवयीन मुला-मुलींच्या आरोग्यावर व भविष्यावर होणारे दुष्परिणाम याबद्दल सविस्तर माहिती दिली. ॲड. साईराम कदम यांनी आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर करताना कोणती काळजी घेतली पाहिजे, याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ॲड. वैभव कांबळे यांनी आपत्कालीन प्रसंगी कायदेशीर मदत मिळवण्यासाठी ‘चाइल्ड हेल्पलाईन’ (क्र. १०९८) चा वापर कसा करावा याची माहिती दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या वतीने समाजशास्त्र विभाग प्रमुख कलावती मेणसे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले. या कार्यशाळेच्या अध्यक्ष स्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्नेहा घाटगे उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू यांचे मार्गदर्शन लाभले.