निपाणी नगरी वृत्तसेवा (6)
तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन’ (ISTE – Indian Society for Technical Education) च्या २०२७-२०३१ या चार वर्षांच्या कालावधीसाठी झालेल्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय निवडणुकीमध्ये निपाणीच्या रायमाने पिता-पुत्राने आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवला आहे. विशेष म्हणजे, स्वतः उच्चशिक्षित इंजिनियर असणाऱ्या या दोघा वडील व मुलाने आपल्या जबरदस्त कर्तृत्वाने या निवडणुकीत ऐतिहासिक बाजी मारत संपूर्ण निपाणी नगरीचा मान देशपातळीवर उंचावला आहे.
प्राप्त माहितीनुसार, आय.एस.टी.ई. (ISTE) च्या या अतिशय महत्त्वाच्या निवडणुकीत अभियंते सुरेश रायमाने (वडील) यांनी थेट ISTE राष्ट्रीय कार्यकारिणी (Executive Council) सदस्य पदावर धडाकेबाज विजय मिळवला आहे, तर त्यांचे सुपुत्र अभियंते पंकज रायमाने (मुलगा) यांनी ISTE कर्नाटक विभाग (Karnataka Section) मधून घवघवीत यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे हे दोघेही स्वतः व्यावसायिक इंजिनियर (Professional Engineers) असून, त्यांच्यासह त्यांच्या संपूर्ण पॅनेलमधून आणखी चार जण असे एकूण सहा सदस्यांनी दणदणीत विजय मिळवून एक नवा इतिहास रचला आहे.
तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च व्यावसायिक संस्था:
नवी दिल्ली येथे मुख्यालय असलेली आणि २२ मे १९६८ रोजी स्थापन झालेली ISTE ही भारतातील तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील एक अग्रेसर राष्ट्रीय,व आंतरराष्ट्रीय स्तरावर ना-नफा तत्त्वावर कार्य करणारी व्यावसायिक संस्था (Professional Body) आहे. तांत्रिक शिक्षणाचा दर्जा उंचावणे, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनाला चालना देणे, प्राध्यापकांचे कौशल्यविकास प्रशिक्षण आणि उद्योग व शैक्षणिक संस्थांमधील समन्वय वाढवणे हे या संस्थेचे मुख्य ध्येय असून, AICTE व NBA यांसारख्या सर्वोच्च संस्था याच्याशी जोडलेल्या आहेत. अशा या नामवंत संस्थेत एकाच कुटुंबातील इंजिनियर पिता-पुत्राने एकत्रितपणे विजय मिळवणे ही निपाणीसाठी अत्यंत गौरवाची बाब आहे.
विजयी उमेदवारांची भावना व आगामी संकल्प:
या दणदणीत विजयानंतर निपाणी नगरीच्या प्रतिनिधीशी बोलताना रायमाने कुटुंबाने सर्व प्राध्यापकवर्ग, अभियंत्या, महाविद्यालयीन संस्थाचालक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. “आपण दिलेला हा विश्वास आमच्यासाठी केवळ विजयाची पावती नसून, तांत्रिक शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याची एक मोठी जबाबदारी आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आगामी काळात ISTE च्या माध्यमातून प्राध्यापकांचे सक्षमीकरण, विद्यार्थ्यांसाठी नवीन संधी, संशोधन आणि तांत्रिक शिक्षणाचा विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. इंजिनियर पिता-पुत्राच्या या दुहेरी यशाबद्दल निपाणी शहरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.