निपाणी नगरी वृत्तसेवा..(7)
येथील निपाणी मराठा मंडळ संचलित निपाणी मराठा मंडळ हायस्कूल, निपाणी येथे कर्नाटक सरकार यांच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक जनजागृती व प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना बालकांवरील लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा २०१२ (पॉक्सो), बालमजुरी (प्रतिबंध व नियमन) कायदा १९८६, बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ तसेच वेठबिगारी पद्धती (निर्मूलन) कायदा १९७६ या महत्त्वपूर्ण कायद्या विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी निपाणी न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. बी. ए. बन्ने यांनी विद्यार्थ्यांना पॉक्सो कायद्याचे कलम ३, ४, ७ व ८ यांविषयी माहिती देताना अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचार हा गंभीर गुन्हा असून त्यासाठी कठोर शिक्षा असल्याचे स्पष्ट केले. तसेच अशा घटनांची माहिती लपविणे देखील कायद्याने गुन्हा ठरतो, याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना जागरूक केले.
त्यानंतर अभियंता व विधिज्ञ इंजि. ॲड. दर्शना शाह यांनी विशेषतः विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र मार्गदर्शन करत पॉक्सो कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली. चित्रफीत सादरीकरणाच्या माध्यमातून त्यांनी मुलींना स्वतःच्या सुरक्षिततेबाबत जागरूक राहण्याचे महत्त्व समजावून सांगितले.
पॉक्सो कायद्यातील कलम ३ व ४ (लैंगिक अत्याचार व त्यावरील शिक्षा) तसेच कलम ७ व ८ (लैंगिक छळ व त्यावरील शिक्षा) याविषयी सोप्या भाषेत माहिती देण्यात आली. कोणत्याही प्रकारचा अनुचित स्पर्श, छेडछाड किंवा मानसिक त्रास सहन न करता त्याबाबत त्वरित पालक, शिक्षक किंवा संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थिनींनी स्वतःच्या अधिकारांची जाणीव ठेवून निर्भयपणे व जागरूकपणे वागावे, असा संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमात निपाणी मराठा मंडळ हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रा.ॲड डी.डी. हळवणकर यांनी वेठबिगारी पद्धती निर्मूलन कायदा १९७६ तसेच भारतीय संविधानातील कलम २३ व २४ यांचा संदर्भ देत वेठबिगारी व बालमजुरीवर पूर्णतः बंदी असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी समाजात अशा अन्यायकारक प्रथा आढळल्यास त्याविरुद्ध जागरूक नागरिक म्हणून आवाज उठवावा, असे आवाहन त्यांनी केले.
या संपूर्ण कार्यक्रमात दृकश्राव्य सादरीकरणाच्या माध्यमातून विविध चित्रफिती व माहिती फलक दाखवून विद्यार्थ्यांना कायद्यांची माहिती सोप्या व समजण्या सारख्या भाषेत देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात सहभाग घेतला.
यावेळी शाळेतील शिक्षक व्ही. व्ही. पत्की, के. एल. कांबळे, ए एम यादव, एस. डी. साखरकर, के. एस. देसाई, अयोध्या मोरबाळे, प्रियांका पाटील तसेच इतर शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जागरूकता वाढण्यास मोठी मदत झाली असून समाजातील बालहक्का विषयी संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.