निपाणी नगरी वृत्तसेवा (25)
“नदी कोरडी ठणठणीत, तलावाने गाठला तळ अन् पालिका अजूनही सुस्त! ८ ते १० दिवसांनी मिळणाऱ्या चिखलमिश्रित पाण्याचा घोट घेत निपाणीकरांनी उन्हाळ्यात होरपळायचं, की प्रशासनाच्या नावाने खडे फोडायचे? डोळे उघडून बघा, परिस्थिती आता हाताबाहेर चालली आहे!”
पावसाळा अजून महिनाभर लांब आहे, तोपर्यंत निपाणीकरांनी काय फक्त पालिकेच्या कोरड्या आश्वासनांवर जगायचे? हा संतप्त सवाल आता विचारण्याची वेळ आली आहे. परिसराची जीवनवाहिनी असलेली वेदगंगा नदी कोरडी ठणठणीत पडली आहे. परिणामी, जवाहर तलावातील पाण्याचा उपसा शुक्रवारपासून पूर्णपणे ठप्प झालाय. तलावाची पातळी दररोज १ ते २ इंचाने खालावत असून ती आता अवघ्या १३ फुटांवर आली आहे. परिस्थिती एवढी गंभीर असतानाही प्रशासन मात्र अजूनही ‘ढिम्म’ आहे.
तिसरा व्हॉल्व्ह सुरू केला; पण जनतेला पाजणार काय, ‘चिखल’?
तलावात पाणी नाही म्हणून प्रशासनाने घाईघाईने तिसऱ्या क्रमांकाचा व्हॉल्व्ह तर सुरू केला, पण नळांना जे पाणी येतंय ते पिण्यायोग्य आहे का? तलावाचा तळ उघडा पडल्यामुळे शहरात अत्यंत गढूळ, मातीमिश्रित आणि अशुद्ध पाणी पुरवले जात आहे. एकीकडे ८ ते १० दिवसांनी पाणी द्यायचे आणि तेही चिखलयुक्त? हा निपाणीकरांच्या आरोग्याशी थेट खेळ चालवला आहे. नागरिकांच्या तक्रारींचे ढीग साचत आहेत, पण पालिकेला याचे कसलेही सोयरसुतक दिसत नाही.
उंचावरील उपनगरे वाऱ्यावर; पाण्याचे नियोजन कागदावरच!
पाण्याची पातळी खालावल्याने पाण्याचा दाब (Pressure) पूर्णपणे गेला आहे. पहिल्या-दुसऱ्या मजल्यावर पाणी चढणे तर दूरच, तळमजल्यावरही थेंब-थेंब पाणी मिळणे कठीण झाले आहे. संभाजीनगर, रामनगर यांसारख्या उंचावर असलेल्या उपनगरांची अवस्था तर भीषण आहे. ‘पाणीपुरवठा विभागा’कडे यावर काय योजना आहे? महाराष्ट्र सरकारने दिलेले हक्काचे पाणी संपले, आता निसर्गाच्या भरवशावर हात बांधून बसण्यापलीकडे प्रशासनाने काय केले? २५ फुटांची धोक्याची पातळी १३ फुटांवर येईपर्यंत जलअभियंते आणि अधिकारी नक्की कोणत्या ‘एसी’ केबिनमध्ये झोपा काढत होते? असा संताप सवाल व्याकुळ नागरिक करत आहेत.
त्यामुळे नागरिकांना आता फक्त पाणी नकोय, तर ते शुद्ध मिळायला हवे. पालिकेने कर वसुलीत कधी सवलत दिली नाही, मग पाणी पुरवताना ही दिरंगाई का? केवळ पाणी सोडल्याचे सोपस्कर पूर्ण करू नका, पाणी गाळून आणि शुद्ध करूनच पुरवा!”असा तगादा लावला आहे
🚨 प्रशासनासाठी ‘अल्टिमेटम’ आणि नागरिकांना जाहीर आवाहन:
पालिकेकडून शुद्धीकरणाची हमी कधी? : ३१ मे ते ३० जून हा काळ अत्यंत कसोटीचा आहे. पालिकेने तातडीने तात्पुरते शुद्धीकरण प्लांट किंवा टँकरची व्यवस्था युद्धपातळीवर करावी, अन्यथा जनतेचा उद्रेक अटळ आहे.
तरीदेखील नागरिकांनो, स्वतःची काळजी स्वतःच घ्या! : प्रशासनाच्या भरवशावर राहून चालणार नाही. नळाला येणारे पाणी शंभर टक्के गाळून आणि उकळूनच प्या. कॉलरा किंवा गॅस्ट्रोसारख्या आजारांना निमंत्रण देऊ नका. पाण्याचा अपव्यय थांबवा पाणी जपून वापरा, गाड्या धुणे किंवा अंगणात पाणी मारणे यांसारख्या गोष्टी सध्यातरी पूर्णपणे थांबवा.