निपाणी नगरी वृत्तसेवा (29)
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून, श्रीराम सेना (कर्नाटक), निपाणी तालुका यांच्या वतीने गांधी चौकातील श्री वेंकटेश मंदिरात आयोजित ‘हिंदू एकता सभा’ उत्साहात पार पडली. या सभेला हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा मोठा प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाची सुरुवात निपाणी शहरातील महापुरुषांना अभिवादन करून झाली. श्रीराम सेनेचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी छ. संभाजी महाराज चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, जत्राट वेस येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बसवेश्वर चौकात जगज्योती बसवेश्वर महाराज यांच्या मूर्तींना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. त्यानंतर मंदिरात छ. शिवाजी महाराज, धर्मवीर छ. संभाजी महाराज, भारत माता आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून सभेचा शुभारंभ झाला. सभेची सुरुवात मंत्रोच्चारात ‘देह मंत्राने’ करण्यात आली.
प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना प्रमोद मुतालिक म्हणाले की, “स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ नाव नसून एक प्रचंड ‘विचारशक्ती’ आहेत. देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी ज्यांनी स्वतःचे संपूर्ण आयुष्य आणि कुटुंबाचे सुख पणाला लावले, असा एकमेव प्रखर नेता म्हणजे सावरकर. स्वातंत्र्यानंतरच्या तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी सावरकरांना उपेक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा विचार हा काल, आज आणि उद्याही हिंदू समाजाला प्रेरणादायी ठरत राहील.”
मुतालिका यांनी अधिक आक्रमकपणे मांडले की, “हिंदू समाज आज विखुरलेला आहे, हीच आपल्या कमकुवतपणाची मुख्य कारणे आहेत. ज्या दिवशी हिंदू समाज एकवटेल, त्या दिवशी शत्रू शक्तींचे मनसुबे उधळून लावले जातील. सावरकरांच्या स्वप्नातील अखंड आणि समर्थ हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी प्रत्येक हिंदूने आता कंबर कसली पाहिजे. हिंदूंची सुरक्षा ही केवळ शासकीय यंत्रणेवर अवलंबून नसून ती आपल्या एकजुटीवर आहे.”
हिंदू जन जागृती समितीचे श्री. महेंद्र आहिरे यांनी सद्यस्थितीवर भाष्य करताना सांगितले की, “लव्ह जिहाद आणि गोहत्या यांसारख्या समस्यांनी हिंदू समाजाला ग्रासले आहे. समाज निद्रिस्त राहिल्यामुळे हे संकट वाढत आहे. सावरकरांच्या विचारांतून अखंड हिंदू राष्ट्र उभे करणे, हाच यावरील एकमेव उपाय आहे.”
या सभेला प.पू. सत्यप्रमोदेंद्र सरस्वती स्वामीजींचे दिव्य सानिध्य लाभले. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून श्री. महेंद्र आहिरे, श्री. शिव भंते, श्रीमती अनिता बनगे, श्री. नितीन काकडे, श्री. रोहन कोठीवाले, श्री. सूरज राठोड, श्री. गजू कट्टीकर आणि श्री. रामभाऊ मेथे उपस्थित होते.
या कार्यक्रमात हिंदू जन जागृती समिती, सनातन संस्था, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांसारख्या प्रमुख हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
या सभेचे सूत्रसंचालन श्री. राजेश आवटे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार श्री. वैभव भाट यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बबन निर्मळे, अजित पारले, विशाल जाधव, अमोल चेंडके, श्रवण कोळी, शेखर पाटील, आकाश मलाडे, पद्माकर भांबुरे, अभिमन्यू बेलगुडे आणि अनेक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा शेवट ‘वंदे मातरम’च्या जयघोषाने करण्यात आला