निपाणी नगरी वृत्तसेवा (1) पडलीहाळ
ग्रंथालय हे केवळ पुस्तकांचे भांडार नसून ज्ञान, विचार, संस्कार आणि वैचारिक परिवर्तनाचे केंद्र असते. वाचनामुळे विचारांना दिशा मिळून ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. ग्रामीण भागातील विद्यार्थी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्याच्या उद्देशाने पडलिहाळ माळ भागात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या शाखा ग्रंथालयाचे उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन करण्यात आले.
कर्नाटक शासनाच्या जिल्हा पंचायत आणि लखनापूर ग्रामपंचायतीच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या या शाखा ग्रंथालयाच्या प्रारंभी ग्रंथपाल सुनीता रणजीत कांबळे आणि जयश्री पोपटलाल कांबळे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शांताराम कांबळे व बाबासाहेब कांबळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, तर बाळकृष्ण शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बाबासाहेब कांबळे आणि ग्रंथपाल सुनीता कांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना ग्रंथालयाचे शैक्षणिक, सामाजिक व वैचारिक महत्त्व अधोरेखित केले. आजच्या मोबाईलच्या युगात विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी डिजिटल माध्यमांच्या वापरासोबतच पुस्तकांच्या वाचनालाही प्राधान्य द्यावे. नियमित वाचनामुळे ज्ञानात भर पडते, विचारशक्ती विकसित होते आणि व्यक्तिमत्त्व घडण्यास मदत होते. गावातील विद्यार्थी, युवक, महिला आणि नागरिकांनी या ग्रंथालयाचा लाभ घेऊन वाचनाची आवड जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास ग्रामपंचायत कर्मचारी नितीन कांबळे, सचिन कांबळे, पिंटू दावणे, ग्रंथपाल सुनीता कांबळे, जयश्री कांबळे, शांताराम कांबळे, दिलावर मुल्ला, अजित कांबळे, भाऊसाहेब भोगले,वैशाली कांबळे, उषा कांबळे, शोभा भारमल, विद्या माने, राणी शितोळे, सुशीला कांबळे, मीनाक्षी कांबळे, सुप्रिया कांबळे, प्रतिक्षा कांबळे अस्मिता भोसले, सुलाबाई कांबळे, गौरी माने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार संजय कांबळे यांनी मानले.