🔷निपाणी नगरी वृत्तसेवा🔷 | दि. ८ जुलै २०२६
निपाणीतील सांस्कृतिक चळवळीला सातत्याने चालना देणाऱ्या अविष्कार सांस्कृतिक अकादमीतर्फे शुक्रवार, दि. १० जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता श्री वेंकटेश मंदिर, निपाणी येथे ‘संतवाणी’ या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तिरस, अभंग आणि दर्जेदार संगीताचा संगम अनुभवण्याची संधी या कार्यक्रमातून रसिकांना मिळणार आहे.
या कार्यक्रमात पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य भक्तिगीत गायक डॉ. संजय गरूड आणि त्यांचे सहकारी संत वाङ्मयातील निवडक रचना सादर करणार आहेत. संत साहित्य आणि सुरेल गायकीचा मिलाफ असलेला हा कार्यक्रम संगीत प्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.
निपाणीत दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांची परंपरा जोपासत कला, संगीत आणि साहित्याची आवड वृद्धिंगत करण्याचे उल्लेखनीय कार्य अविष्कार सांस्कृतिक अकादमी सातत्याने करत आहे. अशा उपक्रमांमुळे स्थानिक रसिकांना उच्च दर्जाच्या कलाविष्काराचा आनंद आपल्या शहरातच अनुभवता येत आहे.
अविष्कारच्या सभासदांसाठी प्रवेश विनामूल्य असून, इतर रसिकांसाठी प्रवेशिका शुल्क रु. १०० ठेवण्यात आले आहे. या स्वरमयी कार्यक्रमाचा लाभ संगीत प्रेमींनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷