विशेष वृत्त | निपाणी नगरी प्रतिनिधी (7) सोमवारची ती रात्र कोल्हापूरच्या दोन कुटुंबांवर कधीही न भरून येणारा आघात करून गेली. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाचा तो तीव्र उतार काल रात्री पुन्हा एकदा रक्ताने माखला. इंडोको रेमिडीज लिमिटेड कंपनीचे एरिया मॅनेजर सोहेल मणेर हे आपल्या सहकाऱ्यांसह कोकण (सावंतवाडी, कणकवली, कुडाळ) भागातील आपले अधिकृत काम संपवून कारने घराकडे परतत होते. कार अंजुम पिंजारी चालवत होते. दिवसभराचा थकवा आणि घरी पोहोचल्यानंतर कुटुंबाला भेटण्याची ओढ… अशा सुखद वातावरणात त्यांचा प्रवास सुरू होता, पण तवंदी घाटात मृत्यू दबा धरून बसला होता.
हॉटेल अमर नजीकच्या भुयारी मार्गाजवळ कार आली असतानाच, मागून येणाऱ्या एका भरधाव स्टील वाहतूक करणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला मागून अशी काही भीषण धडक दिली की क्षणात होत्याचे नव्हते झाले. चिक्कमंगळूरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकचा चालक जाफर सय्यद (वय ३२) याचा वाहनावरील ताबा सुटला आणि हा भीषण अपघात घडला. धडक इतकी जोरदार होती की ट्रकने कारला कित्येक मीटरपर्यंत फरफटत नेले, ज्यामध्ये कारच्या डाव्या बाजूला बसलेल्या सोहेल मणेर व विनोद पाटील या दोन तरुण मित्रांचा जागीच श्वास तुटला.
काळजाला घर पाडणारा तो आक्रोश… > अपघातानंतरचा तो प्रसंग अत्यंत हृदयद्रावक होता. कारचा अक्षरशः चक्काचूर झाला होता आणि ती संरक्षण कठड्याला जाऊन आदळली होती, तर ट्रक थेट रस्त्याशेजारील शेतात जाऊन रुतला. रात्रीच्या त्या भयाण शांततेत जेव्हा निपाणीच्या सरकारी महात्मा गांधी रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांनी धाव घेतली, तेव्हा तिथल्या आक्रोशाने संपूर्ण परिसर हेलावून गेला. कुटुंबाचा मुख्य आधार असलेले दोन तरुण डोळ्यांदेखत अनंतात विलीन झाले होते, हा धक्का सहन करणे तिथे उपस्थित कोणालाही जमणारे नव्हते.
तात्काळ धावले मदतीचे हात: अपघाताचा आवाज ऐकताच महामार्ग देखभाल करणाऱ्या आवताडे कंपनीचे निरीक्षक अक्षय सारापुरे व संतराम माळगे यांनी तत्परता दाखवत पोलिसांना कळवले. घटनेचे गांभीर्य पाहून सीपीआय बी. एस. तळवार, शहर पो. ठाण्याचे उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ, सहाय्यक उपनिरीक्षक एस. एस. चिकोडी, आणि हवालदार प्रभू सिद्धाठगीमठ यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मदतकार्य वेगाने राबवले. यावेळी स्थानिक नेते व माजी सभापती जुबेर बागवान, माजी उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर, अनिस बागवान व अस्लम शिकलगार यांनीही रुग्णालयात धाव घेत जखमींना पुढील उपचारासाठी कोल्हापूरला हलवण्यास मदत केली. निपाणी शहर पोलिसांनी ट्रकचालक जाफर सय्यद याला वाहनासह ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.