निपाणी : निपाणी नगरी वृत्तसेवा | दि. ९ जुलै
निपाणी तालुक्यातील कोडणी येथे घरातील साडीच्या झोपाळ्यावर खेळत असताना गळफास लागून आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभ्रा युवराज राऊत-पाटील (वय १४) ही श्रीपेवाडी येथील हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिक्षण घेत होती. मुसळधार पावसामुळे प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केल्याने ती दिवसभर घरीच होती. आजी पंढरपूरला गेल्याने आजोबा घरी एकटे होते. शुभ्रा दिवसभर शिक्षका सोबत एसआरआरचे फॉर्म भरण्याच्या कामात मदत करत होती.
त्यानंतर घरी साडीचा झोपाळा बांधून झोके घेत असताना झोपाळ्याचा गाठ किंवा फास तिच्या गळ्याभोवती अडकला. या दुर्दैवी प्रकारात तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली.
शुभ्राच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी, आजी, आजोबा असा परिवार आहे. तिच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी घरामध्ये मुलांवर सतत लक्ष ठेवणे, साडी किंवा दोरीपासून तयार केलेल्या झोपाळ्यांचा वापर करताना विशेष काळजी घेणे आणि सुरक्षिततेबाबत मुलांना योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित होत आहे.
🔷