निपाणी नगरी वृत्तसेवा अर्जुननगर (20)
शारीरिक तंदुरुस्ती बरोबरच मानसिक उत्साह टिकवून ठेवायचा असेल, तर प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या जीवनात खेळाला महत्त्व दिले पाहिजे. आजच्या क्रीडा युगात खेळाच्या माध्यमातून शासकीय नोकरी सारख्या संधी उपलब्ध होत असून, विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या खेळात सातत्याने सहभाग नोंदवून स्वतःला सिद्ध करावे व दर्जेदार खेळाडू म्हणून प्रगती साधावी, असे प्रतिपादन देवचंद महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. जी. डी. इंगळे यांनी वार्षिक क्रीडा दिनानिमित्त केले.
या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे स्वागत व प्रास्ताविक क्रीडाशिक्षक प्रा. निरंजन जाधव यांनी केले. मैदान पूजन कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्या सौ. एस. पी. जाधव व पर्यवेक्षक मेजर डॉ. अशोक डोनर यांच्या हस्ते पार पडले.
क्रीडा महोत्सवात इनडोअर खेळांमध्ये बुद्धिबळ, बॅडमिंटन व कॅरम यांचा समावेश होता. तर आउटडोअर खेळांमध्ये फुटबॉल, क्रिकेट व्हॉलीबॉल व कबड्डी आणि मैदानी खेळांमध्ये १०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर धावणे, लांब उडी, थाळीफेक, गोळाफेक व भालाफेक अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या सर्व वैयक्तिक व सांघिक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कुमार आदित्य अजय जाधव (इ. १२ वी, विज्ञान शाखा) व कु. वर्षा श्रीकांत बेनाडे (इ. १२ वी, विज्ञान शाखा) यांनी उत्कृष्ट कामगिरी करत जनरल चॅम्पियनशिप पटकावली. वैयक्तिक व सांघिक विजेत्यांना सन्मानचिन्ह, पदके व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमास जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह, डॉ. सौ. तृप्तीभाभी शाह तसेच संस्थेचे खजिनदार श्री सुबोधभाई शाह यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक-प्राध्यापिका, जिमखाना कर्मचारी वैभव सोनार व शिवदास चव्हाण यांनी सहकार्य केले.