निपाणी नगरी वृत्तसेवा..(9)
पर्यावरण संवर्धनाच्या अखंड साधणेला मिळालेला मानाचा मुकुट म्हणजेच पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांना प्रदान करण्यात आलेला “कर्नाटक राज्य पर्यावरणप्रेमी शिक्षक पुरस्कार.” अखिल कर्नाटक सांस्कृतिक परिषद (नोंदणीकृत), बेंगळुरू यांच्या वतीने आयोजित भव्य साहित्य-सांस्कृतिक सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र–कर्नाटक सीमाभागात पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण आणि प्रेरणादायी कार्याची दखल घेत हा मानाचा पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आला.
ज्ञानयोगी परमपूज्य श्री सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या ज्ञानदासोहच्या प्रेरणेने आयोजित “गुरु नमन – नुडी नमन” या राज्यस्तरीय साहित्य-सांस्कृतिक कार्यक्रमात हा सन्मान सोहळा पार पडला. कन्नड राज्योत्सवाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात बेंगळुरू येथील कुमार गंधर्व भवन येथे देशभरातील साहित्यिक, कवी, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांची उल्लेखनीय उपस्थिती लाभली होती. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा या प्रसंगी गौरव करण्यात आला.
पर्यावरण संरक्षण, वृक्षलागवड आणि समाज..
जागृतीसाठी गेली २५ वर्षे सुविद्य पत्नी विद्या मंदिर शाळेच्या इंग्रजी विषय शिक्षिका अपूर्वा चौगुले यांच्या समर्थ साथीने सातत्याने कार्यरत असलेले शिक्षक नामदेव चौगुले हे पर्यावरणप्रेमी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. निसर्गाशी असलेले त्यांचे नाते हे केवळ कार्यापुरते मर्यादित नसून ते एक प्रकारची जीवन साधनाच आहे. वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन, पर्यावरण जनजागृती आणि विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग प्रेमाची बीजे पेरण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे.
नामदेव चौगुले हे “भूमी वात्सल्य सोशल फाऊंडेशन”चे संस्थापक अध्यक्ष असून प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या “सह्याद्री देवराई” या पर्यावरण चळवळीचे सक्रिय स्वयंसेवक म्हणूनही कार्यरत आहेत. समाजात पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. झाडे लावणे, झाडे जगवणे आणि पर्यावरणाशी माणसाचे नाते दृढ करणे हा त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू राहिला आहे.
या भव्य कार्यक्रमाचे आयोजन एम. शिवप्रसाद गौडा (अध्यक्ष, अखिल कर्नाटक सांस्कृतिक परिषद, बेंगळुरू) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी राज्याध्यक्ष मनोहर के. नायक, आर. महेश (कार्याध्यक्ष) आणि श्रीनिवास कागे (कार्यक्रम संयोजक) यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला डॉ. मयुरी जाधव, प्रकाश कदम यांच्यासह देशभरातून आलेल्या अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या सन्मान सोहळ्याला एक वेगळीच पर्यावरणपूरक छटा प्राप्त झाली. नामदेव चौगुले यांनी उपस्थित सर्व मान्यवर व पुरस्कार सन्मानार्थींचा सत्कार पारंपरिक पुष्पगुच्छ देण्या ऐवजी गुलाबाच्या रोपांची भेट देऊन केला.
“फुले क्षणिक असतात; पण रोपे भविष्यासाठी सावली देतात,” हा संदेश देणाऱ्या या अभिनव उपक्रमामुळे कार्यक्रमाला पर्यावरणपूरक आणि प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले. उपस्थित मान्यवरांनीही या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत चौगुले यांच्या पर्यावरण प्रेमाला दाद दिली.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धन यांचे महत्त्व अधोरेखित केले. वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि नष्ट होत चाललेली जैवविविधता याच्या पार्श्वभूमीवर समाजाने पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
अशा प्रकारे हा सोहळा केवळ सन्मानाचा कार्यक्रम न ठरता पर्यावरणा बद्दल जागरूकता निर्माण करणारा, निसर्ग प्रेमाचा संदेश देणारा आणि समाजाला प्रेरणा देणारा एक अर्थपूर्ण उपक्रम ठरला.
झाडांच्या सावलीत उभा राहून समाजाला हिरव्या भविष्याचा मार्ग दाखवणाऱ्या नामदेव चौगुले यांच्या कार्याचा हा सन्मान म्हणजे निसर्ग सेवेचा गौरवच मानला जात आहे. 🌱🌹