निपाणी नगरी वृत्तसेवा विशेष प्रतिनिधी, कोल्हापूर दिनांक: ०३ जून, २०२६
“सोशल मीडियाच्या वाढत्या विस्तारासोबतच आजचे डिजिटल युग जितके वरदान ठरत आहे, तितकेच ते एका मोठ्या आव्हानाच्या रूपाने समोर येत असून, याच आभासी दुनियेचा वापर करून गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आपले जाळे पसरवत आहेत. अशीच एका निष्पाप तरुणीला सोशल मीडियाच्या माध्यमातून जाळ्यात ओढून, सुरुवातीला ओळख व नंतर विश्वासघात करत तिला मानसिक व भावनिक कोंडीत अडकवल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सायबर गुन्हेगारांनी तिच्या खाजगी माहितीचा गैरवापर करत, बदनामीची भीती दाखवून आणि विविध माध्यमांतून तिच्यावर सातत्याने अत्याचार केले. अखेर या ब्लॅकमेलिंग आणि धमक्यांच्या दुष्टचक्राला कंटाळून पीडित तरुणीने अत्यंत धैर्याने पोलिसांत धाव घेतली आहे. या घटनेने डिजिटल सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला असून, पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आधुनिक सायबर तंत्रज्ञानाच्या आधारे आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी तपास चक्रे वेगाने फिरवली आहेत; याच खळबळजनक घटनेचा सविस्तर तपशील आपण या बातमीत पाहणार आहोत.”
डिजिटल युगातील अतिविश्वास आणि त्यानंतर निर्माण होणाऱ्या भीतीचा गैरफायदा घेऊन एका एकोणीस वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला ब्लॅकमेल करत चौघांनी आलटून-पालटून अत्याचार केल्याची मन सुन्न करणारी घटना कोल्हापुर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. बी.एस.सी. दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या या पीडितेने कॉलेजच्या ओळखपत्रासाठी तिचा फोटो ओळखीच्या आदित्य बाजीराव शेटके (रा. खिंडी व्हरवडे, ता. राधानगरी) याच्या मोबाईलवर पाठवला होता. ओळखपत्र तयार झाल्याचे सांगून आदित्यने ऑक्टोबर २०२५ मध्ये पीडितेला मुदाळ तिट्टा येथे बोलावले आणि तिथून तिला मुरगुड शहरालगतच्या तलावाजवळील झाडीत नेले. तिथे तिच्या खाजगी फोटोचा गैरवापर करून अश्लील फोटो बनवण्याची पहिली धमकी देण्यात आली.
या पहिल्याच प्रसंगी जर समाज आणि बदनामीच्या भीतीने खचून न जाता पीडितेने संपूर्ण धैर्याने प्रसंगवधान दाखवले असते आणि नराधमाच्या धमकीला तिथेच कडाडून विरोध केला असता, तर पुढील अनेक महिन्यांचा पाशवी छळ वेळीच रोखता आला असता. मात्र, त्या भीतीचा गैरफायदा घेत आदित्यने तिला गिरगाव येथील लॉजवर नेऊन तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवले आणि अत्याचार केला. हाच नग्न व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्याने तिला त्याचे मित्र रणजीत संभाजी मुधोळकर (रा. सोळांकुर) आणि प्रणवगिरी चंद्रशेखर पालकर (रा. राधानगरी) यांच्या संपर्कात येण्यास भाग पाडले. या दोघांनीही तिच्या असहायतेचा फायदा घेत तिला वेगवेगळ्या लॉजवर नेऊन ब्लॅकमेल केले आणि तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
या संवेदनशील प्रकरणातील छळाची मालिका इथेच थांबली नाही. आरोपींनी तिला स्नॅपचॅट या सोशल मीडिया ॲपवरून चौथा आरोपी विक्रम रामचंद्र पाटील (रा. बुजवडे) याच्याशी बोलण्यास प्रवृत्त केले. विक्रमने सुरुवातीला तिचे जुने फोटो-व्हिडिओ डिलीट करून प्रकरण मिटवण्याचे खोटे आश्वासन दिले आणि तिचा विश्वास संपादन केला. मात्र, या सहानुभूतीच्या आडून त्याने पाचगाव येथील अशोकराज आणि टॉप हिल लॉजवर तिच्याशी वेळोवेळी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. शेवटी, हे प्रकरण पूर्णपणे मिटवण्यासाठी आरोपींनी पीडितेकडे पैशांची मागणी केली आणि पैसे देऊनही लग्न केल्याशिवाय फोटो डिलीट करणार नसल्याची धमकी दिली. या सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने धैर्याने पाऊल उचलले. तिच्या फिर्यादीवरून मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील या घटनेचा पुढील तपास करत आहेत. हे प्रकरण आजच्या तरुण पिढीला सोशल मीडिया आणि कोणावरही विश्वास ठेवताना अत्यंत सावध राहण्याचा गंभीर इशारा देते.