निपाणी नगरी वृत्तसेवा (5)
आज दिनांक 5 जून -शुक्रवार हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून ओळखला जातो. यानिमित्त आज अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये वृक्षारोपणाचे व बीज संकलनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यार्थ्यांचा समावेश होता.
यानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची रोपे आज स्कूलच्या आवारात लावली. यामध्ये आंबा,फणस, चिकू याच शिवाय विविध प्रकारच्या औषधी व इतर उपयोगी वनस्पतींचा समावेश करण्यात आला.
त्याचप्रमाणे सध्याच्या ऋतूमध्ये जांभूळ, आंबा, फणस, करवंद अशी विविध फळे उपलब्ध असतात. त्यांचे बीज संवर्धन केले तर ते आपल्याला भविष्यातही आपण झाडे लावण्यासाठी वापरू शकतो. कोणत्याही माळरानावरती आपण या बियांच्या माध्यमातून वृक्षारोपण करू शकतो. याचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देत आज शाळेमध्ये बीज संवर्धनाचा उपक्रमही राबविण्यात आला.
यावेळी शाळेच्या प्राचार्या सौ चेतना चौगुले यांनी विद्यार्थ्यांना जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व पटवून देत असताना झाडांचे विविध उपयोग, औषधीय वनस्पतींचे महत्त्व, व बीज संवर्धन या विषयांवर सविस्तर माहिती पटवून दिली. त्याचप्रमाणे सध्या सुरू असलेले निसर्गाचे असंतुलन आपल्याला पूर्वीसारखे करण्यासाठी झाडेच उपयोगी असल्याचे सांगितले व विद्यार्थ्यांना शक्य तेव्हा शक्य तितके वृक्षारोपण करण्यासाठी प्रोत्साहित केले. शिवाय पर्यावरणासाठी घातक असणाऱ्या गोष्टी विद्यार्थ्यांनी टाळाव्यात. यामध्ये शक्यतो प्लास्टिकचा वापर टाळावा असेही विद्यार्थ्यांना सुचविण्यात आले. यावेळी शाळेच्या प्राचार्या सौ चेतना चौगुले यांच्या समवेत सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.