निपाणी नगरी वृत्तसेवा (5)
निपाणी, दि. ५ जून २०२६ : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निपाणी मराठा मंडळ हायस्कूल, निपाणी येथे विविध उपक्रमांसह जागतिक पर्यावरण दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी निपाणी येथील प्रसिद्ध पर्यावरणप्रेमी व शेतकरी श्री. पुंडलिक गणपती नाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे श्री. नाईक यांनी आपल्या मार्गदर्शनात पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. हालसिद्धनाथ साखर कारखान्या जवळील आपल्या सुमारे सात एकर क्षेत्रातील शेतीपैकी दोन ते अडीच एकर क्षेत्रामध्ये त्यांनी ५० हून अधिक प्रकारची फळझाडे, फुलझाडे व आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड केली असल्याची माहिती दिली.
त्यांच्या बागेत विविध प्रकारचे 70 हून अधून प्रकारची झाडे त्यामध्ये आंबे, चिकू, फणस, चिंच, जांभूळ, नारळ, पेरू, करवंद, अंजीर, हुंबर, स्टार फळ, आवळा, डाळिंब, लिंबू, संत्री, मोसंबी आदी फळझाडे आहेत. तसेच जास्वंद, गुलाब, जाई, जुई, चाफा, कमळ, सोनकमळ, भूकमळ, मोगरा, पारिजातक यांसारखी फुलझाडे आणि गुडमार, शिकेकाई, अन्नपूर्णा, पिंपळ, बन्नी, सूर्यफूल, दगडीपाला, जंगली मोगरा, मोह, पपई, काशीभोग, सेमर, कदम, कांचन यांसारख्या विविध वनस्पतींचे संवर्धन त्यांनी केले आहे.
श्री. पुंडलिक गणपती नाईक हे एकटे वास्तव्यास असूनही पशु-पक्ष्यांप्रती विशेष प्रेम जपतात. त्यांच्या परिसरात कुत्रे, मांजरे, गाय, म्हैस यांचे संगोपन केले जाते. तसेच बागेतील फळे मोर, चिमण्या व इतर पक्ष्यांसाठी उपलब्ध करून दिली जातात. शेतातील धान्याचाही काही भाग पशु-पक्ष्यांसाठी राखून ठेवला जातो.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “जोपर्यंत पृथ्वीवर वृक्ष आहेत, तोपर्यंत मानवाचे अस्तित्व आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने आणि प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन केले पाहिजे. पर्यावरणा बरोबरच पशु-पक्ष्यांवरही प्रेम करणे ही काळाची गरज आहे.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हायस्कूलचे मुख्याध्यापक डी. डी. हळवणकर होते. यावेळी ज्येष्ठ शिक्षिका व्ही. व्ही. पत्की, एस. डी. साखळकर, जे. आर. खपले, ए. एम. यादव, के. एल. कांबळे, के. एस. देसाई, अर्चना पाटील, पूजा पाटील, श्रीमती तावदारे , प्रियांका पाटील तसेच लेखनिक मुकुंद कोरे उपस्थित होते. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.