निपाणी नगरी वृत्तसेवा (5)
श्री बाहुबली विद्यापीठ संचलित ए. एस. पाटील हायस्कूल, स्तवनिधी येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी शाळा परिसरात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री. एस. एस. तेरदाळे होते. यावेळी सौ. पी. बी. माणगावे यांनी पर्यावरणाचे महत्त्व, वृक्षसंवर्धनाची आवश्यकता आणि पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येक नागरिकाची जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले. वाढते प्रदूषण आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमात विज्ञान शिक्षक डॉ. आर. ए. तावदारे , श्री. पी. आर. मोळे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणाची शपथ घेत लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. ए. तावदारे यांनी केले. पर्यावरण दिनाचे महत्त्व व कार्यक्रमामागील उद्देश त्यांनी स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पी. आर. मोळे यांनी केले. तर श्री. आर. जी. सौंदलगी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक श्री. एस. एस. तेरदाळे यांनी सर्वांचे अभिनंदन करून पर्यावरण संरक्षणासाठी सातत्याने कार्य करण्याचे आवाहन केले.