निपाणी नगरी वृत्तसेवा (7)
देशभरातील लाखो तरुण आपल्या गरिबीवर आणि हलाखीच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी स्पर्धा परीक्षांचे माध्यम निवडतात. अंगात ताप असताना, खिशात पैशांची चणचण असताना आणि आई-वडिलांनी पोटाला चिमटा काढून पाठवलेल्या पैशांवर हे विद्यार्थी अहोरात्र अभ्यास करत असतात. मात्र, जेव्हा ऐन वेळी परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर किंवा परीक्षा झाल्यावर पेपर फुटीचा आणि परीक्षा प्रक्रियेतील घोटाळ्यांचा उलगडा होतो, तेव्हा त्या केवळ बातम्या नसतात, तर एका अख्ख्या पिढीच्या आत्मविश्वासाचा केलेला खून असतो.
प्रशासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचाराच्या वाळवीने आज देशातील संपूर्ण शिक्षण आणि परीक्षा पद्धतीला पोखरून काढले आहे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या पेपर फुटीच्या टोळ्या राजरोसपणे फिरत आहेत आणि दुसरीकडे प्रामाणिकपणे अभ्यास करणारा तरुण मात्र नैराश्याच्या गर्तेत ढकलला जात आहे. केवळ चौकशीचे आदेश देणे आणि समित्या स्थापन करणे हा यावरचा उपाय असू शकत नाही. जोपर्यंत या घोटाळेबाजांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या पांढरपेशा अधिकाऱ्यांना कठोर कायदेशीर शिक्षा होत नाही, तोपर्यंत सिस्टीमवरील जनतेचा विश्वास परत येणार नाही. प्रशासनाने आता जागे होण्याची गरज आहे, अन्यथा देशातील तरुण रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा संतप्त इशारा आता विद्यार्थी वर्गातून दिला जात आहे.