निपाणी नगरी वृत्तसेवा (7)
देशांतर्गत हवामानाचे चक्र पूर्णपणे बदलले असून त्याचा थेट फटका आपल्या देशाच्या कणा असलेल्या शेतकऱ्याला बसत आहे. कधी अस्मानी संकट म्हणून येणारा अवेळी पाऊस, तर कधी सुलतानी संकट म्हणून समोर उभा ठाकणारा कोरडा दुष्काळ, या दुहेरी कात्रीत आमचा बळीराजा पुरता अडकला आहे. शेतात रक्ताचे पाणी करून, घाम गाळून पीक उभे करावे तर निसर्ग ते हिरावून नेतो आणि जे काही थोडेथोडके हाती येते, त्याला बाजारपेठेत योग्य भाव मिळत नाही. ही आजच्या प्रगत भारताची सर्वात मोठी आणि क्लेशदायक शोकांतिका आहे.
वातानुकूलित दालनात बसून शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या मोठ्या मोठ्या घोषणा करणे आणि निवडणुका आल्या की कर्जमाफीची गाजरे दाखवणे, हा आजकालच्या राजकारणाचा ठरलेला फॉम्र्युला झाला आहे. परंतु, प्रत्यक्षात जेव्हा शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे उद्ध्वस्त होतो, तेव्हा त्याला सरकारी मदतीच्या नावाखाली केवळ कागदी घोडे नाचवायला लावले जातात. उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे, खते आणि बियाणांचे भाव गगनाला भिडले आहेत, पण शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव देण्याच्या नावावर मात्र नेहमीच हात आखडता घेतला जातो. उन्हा-तान्हात मातीशी इमान राखणाऱ्या आणि देशाचे पोट भरणाऱ्या या राजाच्या डोळ्यातील पाणी जोपर्यंत पुसले जात नाही, तोपर्यंत देशाच्या आर्थिक प्रगतीचे ढोल वाजवणे निव्वळ पोकळ आणि ढोंगीपणाचे आहे. बळीराजाला आज तात्पुरत्या अनुदानाची भिक नकोय, तर त्याच्या घामाचे योग्य दाम आणि जगण्याचा अधिकार हवा आहे.