निपाणी नगरी वृत्तसेवा (27)
येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये अग्नि सुरक्षा प्रात्यक्षिक (Fire Safety Mock Drill) हा आणीबाणीच्या प्रसंगी आग आटोक्यात आणण्यासाठी आणि सुरक्षित बाहेर पडण्यासाठी आयोजित केला जाणारा एक अत्यंत महत्त्वाचा जनजागृती कार्यक्रम सादर करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात आगीची कारणे, धोके आणि प्रतिबंध याविषयीच्या मार्गदर्शनाने झाली. यामध्ये आग विझवण्याच्या साधनांचा प्रत्यक्ष वापर आणि सुरक्षित स्थलांतराची पूर्वतयारी कशी करावी हे सांगण्यात आले. अग्नि सुरक्षा प्रात्यक्षिकामध्ये आगीचे विविध प्रकार आणि उपाययोजना यांची माहिती निपाणी अग्निशमन दलाचे हवालदार उदय पतन यांनी दिली.
आग लागल्यास त्वरित योग्य पद्धतीचा वापर करून आग कशी विझवावी याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. यामध्ये निपाणी अग्निशमन दलाचे महेश माळगेमनी, बी. एस. बजंत्री, देवेंद्र राठोड, अजित कनंगलावार व विशाल पुजारी हे सामील झाले होते.
सदर अग्निसुरक्षा प्रात्यक्षिकामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्नेहा घाटगे यांनी स्वतः भाग घेतला. अग्निशमन दलाच्या अग्नि सुरक्षा प्रात्यक्षिकाचा सर्व विद्यार्थी व शिक्षकानी थरारक अनुभव घेतला. या कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू यांचे मार्गदर्शन लाभले.