निपाणी नगरी वृत्तसेवा संकेश्वर (१५)
सोलापूर (तालुका हुक्केरी) हद्दीतील पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील सेवा रस्ता लगत २६ मे २०२६ रोजी अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याची नोंद संकेश्वर पोलीसांत करण्यात आली होती. सोशल मिडियावरील इन्स्टाग्रामवर प्रसारीत झालेल्या व्हिडिओ पाहून १ जून २०२६ रोजी श्रीमती शबाना बादशहा मुल्ला राहणार गोसावी गल्ली रेठरे हरणाक्ष तालुका वाळवा जिल्हा सांगली यांनी संकेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी सोलापूर हद्दीत आढळलेली अनोळखी महिला आपली आई बेबी बादशहा शेख वय ( ५९ ) असून राहणार इंद्रजित नगर उंचगाव सध्या राहणार शाहु काॅलनी टेंबलाईवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर असल्याचे सांगून ओळख पटवून दिली. माझ्या आईकडून आरोपी हाजीमस्ताना मैनोद्दीन बागवान वय ( ४२ ) राहणार विक्रम नगर जोशी गल्ली कोल्हापूर याने कर्ज घेतले होते. पैशाच्या देवाणघेवाणीतून हाजीमस्ताना याने माझ्या आईचा खून केल्याची फिर्याद संकेश्वर पोलीस ठाण्यात दाखल केली.
बेळगांव जिल्हा पोलीस प्रमुख के रामराजन सहाय्यक पोलीस प्रमुख आर बी बसर्गी गोकाक डीएसपी रवि डी नायक यांच्या मार्गदर्शनाखाली संकेश्वर पोलीस निरीक्षक गणपती कोगनोळी यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय विठ्ठल नाईक पोलीस कर्मचारी एस एल गळतगी व्ही जी कुड्डगोळ यांनी लागलीच कोल्हापूर गाठून हाजीमस्ताना बागवान याला घरातून उचलले.
आरोपी हाजीमस्तानाला संकेश्वर पोलीस ठाण्यात आणून पोलीस खाक्या दाखविला असता आरोपींनी आपण बेबी शेख यांचेकडून १ लाख ५० हजार रुपये कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड करण्यास बेबी शेख यांनी तगादा लावला होता. त्यामुळे आपण बेबी शेखला संपविण्याचा निर्णय घेतला. २५ जून २०२६ रोजी बेबी शेख यांनी आपणाला फोन लावला. लोकापूर येथील इसमा कडून पैसे आणावयाचे आहेत. ताबडतोब कारगाडी घेऊन ये संधी चालून आल्याने आपण लागलीच कारगाडीची व्यवस्था केली. बेबी शेखला घेऊन लोकापूरकडे जाताना आपण पिण्याच्या पाण्यात विष घालून ते पाणी बेबी शेखला पिण्यास दिले. बेबी शेख मरण पावल्याची खात्री करून घेऊन तिच्या मृतदेहाची कर्नाटकातील सोलापूर फाट्यावर विल्हेवाट लावली. बेबी शेखचा खून करुन काटा काढल्याचे हाजीमस्ताना मैनोद्दीन बागवान याने पोलीसांसमोर कबूल केले. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्यातील महिलेच्या खूनाचा तपास लावणारे संकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणपती कोगनोळी पीएसआय विठ्ठल नाईक एल एस खोत एएसआय सी जे सारापूरे पोलीस कर्मचारी के डी हिरेमठ एस एल गळतगी एस बी पुजेरी एस एम एक्संबी व्ही जी कुड्डगोळ एम के अत्तार टेक्निकल सेलचे विनोद ठक्कण्णावर सचिन पाटील यांच्या कार्याची प्रशंसा बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख के रामराजन यांनी केली आहे.