निपाणी नगरी वृत्तसेवा (१४)
मराठा मंडळ बेळगाव संचलित मॉडर्न इंग्लिश मिडीयम स्कूल, निपाणी येथे आज विद्यार्थी प्रतिनिधी मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली. ही विद्यार्थ्यांमध्ये ‘नेतृत्व क्षमता प्रज्वलित करणारी परिषद’ होती. याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुणांना चालना देणे व त्यांना प्रेरित करणे हा असतो.
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी व समाजसेवक श्री. दिलीप राजाराम पठाडे यांना आमंत्रित करण्यात आले होते.
इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यानंतर स्नेहल पाटील हिने प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. संस्थेच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा सत्कार शाळेच्या मुख्याध्यापिका सौ स्नेहा घाटगे यांच्या हस्ते करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यानंतर विद्यार्थी प्रतिनिधी व हाऊस लीडर्स यांनी पथ संंचलन केले. त्यांच्या संचलनातील तालबद्धता आणि जोश खरोखरच कौतुकास्पद होता. शाळेची मूल्ये, शिस्त आणि एकता टिकवून ठेवण्याचा संकल्प करण्यात आला.
त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नव्याने निवड झालेल्या विद्यार्थी प्रतिनिधींना ( हेड बॉय, हेड गर्ल, हाउस कॅप्टन आणि इतर मंत्रिमंडळ) बॅज व पदभार (Sashes) लावून सन्मानित करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थी प्रतिनिधी मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. यानंतर विद्यार्थी प्रतिनिधी लोकेश मुगळे व प्रांजळ जिनगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. दिलीप राजाराम पठाडे यांनी विद्यार्थी दशेतील जबाबदारी आणि कौशल्य याबद्दल मार्गदर्शन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ स्नेहा घाटगे यांनी विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाबरोबरच नेतृत्व गुण विकसित करण्यात शाळेची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरांग घोटणे व समर्थ आयरेकर यांनी केले. डॉ. ऋतुजा देसाई यांनी आभार व्यक्त केले. सदर कार्यक्रमासाठी पालकांची उपस्थिती उल्लेखनीय होती. कार्यक्रमाची तयारी व तो यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विद्यार्थी व शिक्षकांच्या सहाय्याने समाजशास्त्र विभागाच्या शिक्षिका दिपाली पाटील व कलावती मेणसे यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू यांचे मार्गदर्शन लाभले.