निपाणी नगरी वृत्तसेवा (27)
अर्जुननगर येथील मोहनलाल दोशी विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त आयोजित करण्यात आलेला दिंडी व पालखी सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांमध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा, संतांचे विचार आणि भारतीय संस्कृतीची जपणूक व्हावी, या उद्देशाने विद्यालयात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पालखीचे पूजन मुख्याध्यापिका श्रीमती एस. एम. गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्ही. आर. पाटील यांनी केले. यावेळी डी. बी. बेनाडे व कु. ज्ञानेश्वरी पोवार यांनी आषाढी एकादशीचे धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक महत्त्व विशद केले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासह संत परंपरेने समाजाला समता, सेवा, भक्ती आणि मानवतेचा दिलेला संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आषाढी एकादशी हा केवळ धार्मिक उत्सव नसून श्रद्धा, शिस्त, संयम, एकात्मता आणि सदाचाराची शिकवण देणारा महत्त्वाचा दिवस असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कु. स्वरांजली पेडणेकर हिने सुमधुर अभंग गायन सादर करून उपस्थितांना विठ्ठल भक्तीत तल्लीन केले. तसेच अभंग गायन स्पर्धाही उत्साहात पार पडल्या. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अभंगांमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला.
यानंतर पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांनी डोक्यावर तुळसी वृंदावन व कलश धारण करून, लेझीमच्या ठेक्यावर वीणा, टाळ आणि मृदंगाच्या साथीने “ज्ञानोबा-तुकाराम” तसेच विठ्ठलनामाचा गजर करत बसवाननगर परिसरातून दिंडीचे उत्साहपूर्ण मार्गक्रमण केले. दिंडीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध सहभागाने आणि भक्तिमय वातावरणाने परिसरातील नागरिकांचेही लक्ष वेधून घेतले.
यावेळी आर. डी. पाटील, आर. एस. भोसले, आर. डी. देसाई, शिक्षक प्रतिनिधी एस. बी. यादव, कर्मचारी प्रतिनिधी ए. व्ही. तेली यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री. आशिष भाई शाह तसेच सर्व संचालकांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले.