निपाणी नगरी वृत्तसेवा (29)
तहसीलदार प्लॉट, निपाणी येथे मोरे परिवाराच्या वतीने गुरुपौर्णिमेचा उत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि भव्य दिव्य पणाने साजरा करण्यात आला. समाजात विविध सामाजिक उपक्रम राबवून आपली सामाजिक बांधिलकी जपणार्या मोरे परिवाराने या वर्षीही अध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरेचा सुरेख संगम साधत या सोहळ्याचे आयोजन केले होते.
या सोहळ्यात आयोजित प्रवचन सेवेत तमनाकवाडा तालुका कागल येथील सिद्धपुरुष शिवयोगी सुरेशजी महाराज यांनी आपल्या अत्यंत ओघवत्या आणि मंत्रमुग्ध करणार्या वाणीतून गुरुपौर्णिमेचे आणि अध्यात्माचे मानवी जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व विस्तृतपणे विशद केले. मानवी जीवनात सद्गुरूंचे स्थान सर्वोच्च असून सद्गुरूंच्या कृपेनेच माणसाच्या मनातील भीती व अंधकार नष्ट होतो, असे त्यांनी प्रतिपादन केले.
आपल्या प्रवचनाचे स्पष्टीकरण करताना महाराजांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा अत्यंत भावगर्भ अभंग निरूपणासाठी घेतला. त्यामध्ये त्यांनी मांडले:
श्रीगुरु सारिखा असता पाठीराखा। इतरांचा लेखा कोण करी ॥१॥
राजयाचा संग परिधान वस्त्र। धुपदीप अस्त्र काय उणे ॥२॥
तुका म्हणे मना भय नाही काडी। आम्हावरी जोडी कृपेची ती ॥३॥
या अभंगाचा सखोल अर्थ समजावून सांगताना महाराज म्हणाले की, ज्याच्या पाठीशी साक्षात श्रीगुरुंचे छत्र आणि आशीर्वाद असतात, त्याला जगातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज उरत नाही. ज्याप्रमाणे राजाचा सहवास लाभलेल्या व्यक्तीला सुंदर वस्त्रे, अस्त्रे आणि ऐश्वर्याची कधीही कमतरता भासत नाही, त्याचप्रमाणे ज्याच्यावर गुरुंची कृपा असते, त्याच्या जीवनात कोणत्याही सुखाची आणि आनंदाची उणीव राहत नाही. सद्गुरूंच्या कृपेची जोडी पाठीशी असल्यामुळे मनातील भीतीचा एक कणही नष्ट होतो, हा विचार महाराजांनी सोप्या आणि प्रभावी भाषेत श्रोत्यांच्या मनावर बिंबवला.
या अध्यात्मिक कार्यक्रमात संगीत विशारद गुरुवर्य ह.भ.प. वसंतराव रांगोळे यांनी आपल्या मधूर गायनाने भाविकांना मंत्रमुग्ध केले, तर श्री नाशीरजी मुल्ला यांनी उत्तम तबला साथ देऊन कार्यक्रमात रंगत आणली.
या सोहळ्यास ह.भ.प. दत्ता कुंभार महाराज, वारकरी संप्रदाय सेवा मंडळ शिरगुप्पी, ह.भ.प. सतिश काजवे, बाळासाहेब निंबाळकर, संजय माने, सोमनाथ बाळमारे, सुभाष कित्तुरकर, श्री आनंदराव नलवडे, प्रदीप बाळमारे, एकनाथ नलवडे, ह.भ.प. राम चव्हाण, राकेश कांबळे यांच्यासह तवंदी, शिरगुप्पी, शिप्पूर आणि निपाणी परिसरातील संगीत क्षेत्रातील बंधू-भगिनी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्तिमय वातावरण, संगीताची जोड आणि भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा गुरुपौर्णिमा उत्सव निपाणी नगरीत अत्यंत अभूतपूर्व असा पार पडला