निपाणी नगरी वृत्तसेवा (17)
मराठा मंडळ संचलित बालवाडी, मराठी विद्यानिकेतन प्राथमिक शाळा व निपाणी मराठा मंडळ हायस्कूल, निपाणी यांच्या संयुक्त विद्यमाने नागपंचमीचा सण पारंपरिक उत्साह, भक्तिभाव व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.
नागपंचमीच्या निमित्ताने शाळेच्या परिसरात पारंपरिक पद्धतीने नागदेवतेचे पूजन करण्यात आले. यावेळी पालक श्री. सुबोध कुलकर्णी, श्री. रोहित कदम तसेच सौ. मनीषा रोहित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत नागदेवतेच्या प्रतिमेचे पूजन करून श्रीफळ वाढविण्यात आले. विद्यार्थ्यांना आपल्या भारतीय संस्कृतीतील सण-उत्सवांचे महत्त्व समजावे, पारंपरिक मूल्यांची जपणूक व्हावी आणि आपल्या समृद्ध संस्कृतीशी त्यांची नाळ जोडली जावी, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रा. ॲड. डी. डी. हळवणकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “आपले सण-उत्सव हे केवळ धार्मिक विधी नसून ते आपल्या संस्कृतीचे, परंपरेचे आणि संस्कारांचे जिवंत प्रतीक आहेत. आजच्या आधुनिक व तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची ओळख करून देणे आणि तिचे जतन करण्याची जाणीव निर्माण करणे ही शिक्षण संस्थेचीही जबाबदारी आहे. नागपंचमी सारख्या सणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये श्रद्धा, संस्कार, निसर्गप्रेम आणि सामाजिक एकात्मतेची भावना रुजते. आपल्या समृद्ध परंपरेचा अभिमान बाळगत आधुनिक शिक्षणाकडे वाटचाल करणे हीच काळाची गरज आहे.”
नागपंचमीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. पारंपरिक वेशभूषा, धार्मिक संस्कार, सामूहिक सहभाग आणि आनंदी वातावरणामुळे शाळेचा परिसर उत्सवी रंगात न्हाऊन निघाला. भारतीय संस्कृतीतील सण केवळ धार्मिक परंपरा नसून त्यामागील सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा सुंदर प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला.
कार्यक्रमास प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बाळासाहेब मोहिते तसेच प्राथमिक विभागाचे कार्यकारी अधिकारी अमोल पाटील, यावेळी हायस्कूलच्या ज्येष्ठ शिक्षिका व्ही. व्ही. पत्की, एस. डी. साखळकर, जे. आर. खपले, ए. एम. यादव, के. एल. कांबळे, के. एस. देसाई, तसेच अर्चना पाटील, पूजा पाटील, प्रियांका पाटील, धनश्री पाटील, एस बी चौगुले उपस्थित होते.
प्राथमिक विभागातून एस. एस. पाटील, जी. एस. पाटील, पी. एस. घाटगे, एस. बी. कांबळे, व्ही. एस. बुरुड, जे. पी. ढंगे, एस. एस. मोरे, एम. ए. चव्हाण, आश्लेषा केसरकर यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक शिक्षणार्थी व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.