निपाणी नगरी वृत्तसेवा (16)
गुणवत्ता, संस्कार आणि यशाची ६ वर्षे पूर्ण करत निपाणी येथील ‘ग्रँड सायन्स अकॅडमी’चा ६ वा वर्धापन दिन आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात बाबा लॉन, देवचंद कॉलेज समोर, मुरगूड रोड, निपाणी येथे संपन्न झाला. सन 2020 मध्ये अगदी कोरोना महामारीच्या काळात अवघ्या ८ विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला या अकॅडमीचा प्रवास सहा वर्षांमध्ये प्रतिवर्षी २५० हून अधिक विद्यार्थ्यांचा दैदीप्यमान व प्रेरणादायी प्रवास पूर्ण करत आहे. ग्रामीण भागासह सीमा भागातील विद्यार्थ्यांचा वाढता कल लक्षात घेता ग्रँड सायन्स अकॅडमीची शिकवण्याची पद्धत सर्वांना सर्वश्रुत होत आहे.
कार्यक्रमाची सुरुवात अतिशय शिस्तबद्ध वातावरणात झाली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अकॅडमीचे विषय शिक्षक शुभम तोरसकर यांनी केले, तर संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन तेजस्विनी पाटील यांनी अतिशय प्रभावीपणे सांभाळले.
या आनंद सोहळ्यात अकॅडमीमध्ये शिकून बाहेर नोकरी व उच्च शिक्षण घेणाऱ्या पूर्वा कुलकर्णी, आरती चौगुले या माजी विद्यार्थिनींसह पालक श्रीधर कुलकर्णी, रिजवान मुल्ला आणि विजय पाटील यांनी अकॅडमी संदर्भात आपले मनोगत व्यक्त केले. मनोगत व्यक्त करताना पालकांनी सांगितले की, लाखो-करोडो रुपयांचा खर्च करून मिळणारे उच्च दर्जाचे शिक्षण ग्रँड सायन्स अकॅडमीमध्ये अतिशय कमी आणि माफक फी मध्ये दिले जाते. आज आमची मुले विविध व्यासपीठांवर जेव्हा आत्मविश्वासाने मुलाखती देतात, तेव्हा आम्हाला अकॅडमीचा सार्थ अभिमान वाटतो. कमी पैशात सुलभ शिक्षण देणारी आणि सर्वसामान्य माणसांचे जीवनमान उंचावणारी संस्था म्हणजे ग्रँड सायन्स अकॅडमी असल्याचे मत सर्वांनी एकमुखाने व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे देवचंद कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक डोनर यांनी देवचंद महाविद्यालयात रीतसर प्रवेश घेऊन अकॅडमीच्या माध्यमातून उज्वल भविष्य घडवणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच पाणी या संकल्पनेवर आधारित एक सुंदर उदाहरण देत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली आणि वातावरण हलकेफुलके केले. मोहनलाल दोशी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. एम. गोडबोले यांनी देखील विद्यार्थ्यांनी अकॅडमीच्या माध्यमातून गरुड झेप घेणे म्हणजे काय असते, ही संकल्पना आपल्या मनोगतातून मांडली. यावर्षी अकरावी मध्ये प्रवेश घेतलेल्या तसेच मागील वर्षाच्या अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्ञान
कार्यक्रमाचे प्रमुख युवा व्याख्याते मा. श्री. युवराज दादासो पाटील यांनी अतिशय ओघवत्या वाणीमध्ये ‘दीदी आणि दादा’ म्हणत अकॅडमीच्या विद्यार्थ्यांशी थेट हृदयसंवाद साधला. आपण कोणतेही साग्रसंगीत, व रसपूर्ण मार्गदर्शन करणार नसून, मला आज पर्यंत मिळालेल्या अनुभवातून, शिक्षणातून, समाजातून, मिळालेल्या शिदोरीतून आपली वाट कशी सुलभ करता येईल याची त्रिसूत्री मांडणार असल्याचे सांगितले. त्यांनी ‘मन, मनगट आणि मेंदू’ या संकल्पनेवर सविस्तर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, जेव्हा विद्यार्थ्यांचे विचार शुद्ध आणि सकारात्मक असतात तेव्हा त्याचे ‘मन’ भक्कम होते, कष्ट करण्याची तयारी आणि जिद्द असेल तर ‘मनगट’ मजबूत होते, आणि योग्य अभ्यासातून मिळवलेले ज्ञान हे ‘मेंदू’ बळकट करते. जर आपले मन, मनगट आणि मेंदू ही त्रिसुर्ती बळकट असेल आणि आपली सर्जनशीलता सजग असेल, तर आयुष्यातील कोणताही Speed Breaker किंवा अडचणी या हिमालया सारख्या अथांग न वाटता एका चिमुकल्या मुंगीसारख्या क्षुल्लक वाटतील. यासोबतच त्यांनी वेळेचा सदुपयोग करणे आणि सोशल मीडियाच्या अनावश्यक वापरापासून दूर राहणे अत्यंत गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्टफोनमधील १.५ GB डेटापेक्षा आपल्या मेंदूची, डोळ्यांची आणि हृदयाची क्षमता कितीतरी कैकपटीने मोठी आहे, याची जाणीव त्यांनी करून दिली. छत्रपती शिवाजी महाराज, बुद्धिबळ विजेता डी. गुकेश, अंतराळवीर कल्पना चावला व सुनीता विल्यम्स यांच्या हुशारीचा आणि सर्जनशीलतेचा दाखला देत त्यांनी लहान वयातच मोठी स्वप्ने पाहण्याचे आवाहन केले. “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये अफाट क्षमता असते, कारण त्यांना गमवायला काही नसून कमवायला संपूर्ण जग समोर असते; त्यांना व्याकरण कळत नसेल तरी अंतःकरण नक्की कळते,” असे सांगत त्यांनी दीड तास विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध करून सभागृहात पूर्ण शांतता मिळवली.
शेवटी ग्रँड सायन्स अकॅडमीचे सर्वेसर्वा मा. श्री. युवराज पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अकॅडमीचा आजपर्यंतचा खडतर प्रवास विशद केला. अतिशय कठीण परिस्थितीतून JEE, NEET, इंजिनिअरिंग व मेडिकल प्रवेश परीक्षांच्या माध्यमातून आज अनेक विद्यार्थी मोठ्या हुद्द्यांवर कार्यरत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. इथून पुढेही अकॅडमीच्या माध्यमातून उत्कृष्ट कामगिरी करत हजारो विद्यार्थी घडवण्याचा वसा कायम ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षक शुभम तोरसकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.