निपाणी नगरी वृत्तसेवा (20)
कोगनोळी येथील इंटरनॅशनल पब्लिक स्कूल व आर्ट्स प्रि मिलिटरी कॉलेज व युवा सायन्स अकॅडमी या सैनिकी संकुलात कोगनोळी येथील वैष्णवी गिरीबुवा हिची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव कुमार पाटील हे होते. तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेच्या अध्यक्षा, रेखा पाटील, प्राचार्य अनमोल पाटील व मुख्याध्यापिका कोमल पाटील हे उपस्थित होते. प्रारंभी अक्षता कांबळे यांनी या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले. नंतर संस्थेचे सचिव कुमार पाटील यांच्या अमृत हस्ते वैष्णवी गिरीबुवा हिचा शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. नंतर मनोगत व्यक्त करताना वैष्णवी गिरीबुवा यांनी कोणतेही यश हे सहज मिळत नाही पण त्यामागील संघर्ष आपला इतिहास घडवतो. जो संकटावर अथवा परिस्थितीवर मात करून पुढे जातो तो नक्कीच विजयी होतो हे आपण स्वीकारले पाहिजे. प्रत्येक यश मिळवताना प्रयत्न, सातत्य व आत्मविश्वास हे महत्त्वाचे आहेच. पण अपयश पचविण्याची ताकदही तितकीच महत्त्वाची असते. उच्च ध्येय गाठण्यासाठी प्रत्येकाने आपल्या स्वबळावर आपल्या संघर्षाची गाथा लिहून यश मिळवावे असे प्रेरणादायी विचार त्यांनी मांडले.
संस्थेचे प्राचार्य अनमोल पाटील यांनी मार्गदर्शन करताना संघर्ष जितका मोठा, तितके यश अधिक प्रेरणादायी असतो. म्हणूनच परिस्थिती कोणतीही असो, ध्येय निश्चित ठेवून प्रामाणिक मेहनत आणि सातत्याने प्रयत्न करत राहिले पाहिजे असे सांगितले . यावेळी संकुलातील सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार पवार यांनी केले तर आभार सचिन पाटील यांनी मानले.