निपाणी नगरी वृत्तसेवा (20)
15 ऑगस्ट भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त निपाणी येथील तालुकास्तरीय मुख्य शासकीय कार्यक्रमात येथील दि फिमेल एज्युकेशन सोसायटी संचलित, सौ भागीरथीबाई शाह कन्या शाळेच्या ‘गर्ल गाईड’ (Girl Guide) विद्यार्थिनींनी उत्कृष्ट शिस्त आणि पथसंचलनाचे प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या घवघवीत यशाबद्दल शाळेच्या वतीने यशस्वी विद्यार्थिनींचा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात विशेष सत्कार करण्यात आला.
तालुका स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या या दिमाखदार पथ संचलनात विविध शाळांच्या पथकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये आमच्या शाळेच्या गर्ल गाईडच्या विद्यार्थिनींनी अत्यंत आत्मविश्वासाने, शिस्तबद्धतेने आणि लयबद्ध तालावर पथसंचलन करत उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत तालुका प्रशासनाकडून त्यांना द्वितीय क्रमांकाचे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ.सौ. एस जे पाटील म्हणाल्या की, “विद्यार्थिनींच्या या यशामागे त्यांची कठोर मेहनत, मार्गदर्शक शिक्षकांचे परिश्रम आणि शाळेची शिस्तबद्ध परंपरा आहे. या यशाने शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून, यामुळे इतर विद्यार्थ्यिनीं मध्येही देशसेवा आणि शिस्तीची भावना निर्माण होईल.”
विद्यार्थिनींना संस्थेचे चेअरमन श्रीमान आशिषभाई शाह व संचालक मंडळाचे प्रोत्साहन तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सौ.एस. जे पाटील क्रीडा शिक्षिका ए.डी. पाटील व सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.