निपाणी नगरी वृत्तसेवा (20)
निपाणी : साहित्य क्षेत्रात आपल्या स्वतंत्र लेखनशैलीने आणि ग्रामीण जीवनाचे अस्सल लेखन करणाऱ्या कै. महादेव मोरे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त शुक्रवारी, दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती ग्रंथालय, निपाणी येथे अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती ग्रंथालय, निपाणी व साहित्यिक रसिक मंडळ, निपाणी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे.
महादेव मोरे हे निपाणी परिसरातील साहित्यविश्वात प्रगल्भ आणि संवेदनशील ग्रामीण कवी म्हणून परिचित होते. ग्रामीण जीवन, माणसांचे भावविश्व, नातीगोती, सामाजिक वास्तव आणि गावाकडच्या जगण्यातील बारकावे त्यांनी आपल्या लेखणीतून अत्यंत सहजपणे मांडले. ग्रामीण भाषेचा बाज आणि मातीतला अस्सल गंध जपत त्यांनी कविता, कथा, कादंबरी अशा विविध साहित्यप्रकारांत उल्लेखनीय योगदान दिले.
त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांच्या साहित्याची शासनानेही दखल घेतली होती. साहित्य व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. त्यांच्या अनेक कथा-कादंबऱ्या विविध वर्तमानपत्रांमधून क्रमशः प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे त्यांच्या लेखनाला निपाणी परिसरासह साहित्यप्रेमी वाचकांकडून विशेष प्रतिसाद मिळत होता.
महादेव मोरे यांच्या साहित्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील सहजता, ग्रामीण बोलीची लय आणि समाजजीवनाचे वास्तवदर्शी चित्रण. सामान्य माणसाच्या सुख-दुःखांना शब्द देताना त्यांनी आपल्या लेखणीतून ग्रामीण संस्कृतीचा समृद्ध ठेवा जपला. त्यांच्या साहित्यकृती आजही वाचकांना आपल्या मातीशी आणि माणुसकीशी जोडणारा अनुभव देतात.
या पुण्यस्मरण कार्यक्रमात प्रा. शिवाजी मोरे यांच्याकडून महादेव मोरे यांच्या नव्याने प्रकाशित झालेल्या पुस्तकांचा ग्रंथालयास भेट देण्याचा कार्यक्रमही होणार आहे. साहित्यप्रेमी, रसिक व वाचकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून महादेव मोरे यांच्या साहित्यिक स्मृतींना अभिवादन करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्थळ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती ग्रंथालय (नगरपालिकेसमोर), निपाणी
वेळ : शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट २०२६, सायं. ५:०० वा.