निपाणी नगरी वृत्तसेवा.(7)
5 एप्रिल 2026 रोजी जिल्हा पंचायत बेळगावी, निपाणी तालुका तहसीलदार ऑफिस, तालुका पंचायत, नगरपालिका निपाणी यांच्या संयुक्त विद्यमाने बाबू जगजीवन राम यांची जयंती जत्राटवेस येथील संत रोहिदास भवन येथे मोठ्या उत्साहात साजरी.
प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे अध्यक्ष व निपाणी तालुक्याचे तहसीलदार श्री सुरेश मुंजे यांच्या शुभहस्ते बाबू जगजीवन राम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तर दीप प्रज्वलन तालुका पंचायत अधिकारी प्रवीण कट्टी व नगरपालिका आयुक्त श्री गणपती पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्षा सुनीता सोनकांबळे, निपाणी गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक, समाज कल्याणचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आपल्या व्याख्यानात युवा व्याख्याते मिथुन मधाळे यांनी बाबू जगजीवन राम यांचे शैक्षणिक व संपूर्ण राजकीय कारकीर्द आपल्या व्याख्यानातून स्पष्ट केले. बाबू जगजीवन राम हे उत्तर भारताचे काँग्रेसमधील सर्वात मोठे नेते होते. महात्मा गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला 1936 ते 1986, 50 वर्षे इतका दीर्घ कालखंड ते भारतीय राजकारणात सक्रिय होते. 31 वर्ष केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी या देशांमध्ये काम पाहिले. जगात पन्नास वर्षे राजकारणात असणारी एकमेव व्यक्ती म्हणून त्यांच जागतिक रेकॉर्ड आहे.
या देशातील दलित शोषित वंचित या सर्वांच्या समतेसाठी त्यांनी आपले जीवन व्यतीत केलेले आहे. स्वतंत्र पूर्व कालखंडामध्ये त्यांना कित्येक वेळा तुरुंगवास भोगावा लागला. देशाच्या स्वातंत्र्याच्या निर्णयांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका मांडली होती. देशाच्या स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतर केंद्रीय कामगार मंत्री, संचार मंत्री, रेल्वेमंत्री, संरक्षण मंत्री, अन्न व कृषी मंत्री, सामाजिक मंत्री, सिंचन मंत्री, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पहिले दलित अध्यक्ष होते. त्यांना बिर्ला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच आंध्र विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट ही पदवी दिली होती, 1971 च्या भारत पाक युद्धात बांगलादेशाच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचा निर्णय त्यांनी घेतलेला होता. देशातील हरित क्रांतीला महत्त्वाची चालना दिली व देश अन्नधान्या मध्ये समृद्ध करण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. देशातील रेल्वेचे जाळे पसरविणे, देशातील प्रतीक कार्यालयामध्ये टेलिफोन व पत्रव्यवहार सुरळीत होण्याची महत्त्वाची भूमिका बजावली. ते काँग्रेसचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात ते महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्यासोबत नेहमी होते पण त्यांनी इंदिरा गांधीजींच्या 25 जून 1975 त्याच्या आणीबाणीला विरोध केला होता, त्याच दिवशी त्यांनी काँग्रेस डेमोक्रसी पार्टीची स्थापना केली होती. पण पुढे जाऊन त्यांनी त्याचे विलीनीकरण जनता पार्टीमध्ये केले व ते या देशाचे पहिले दलित उपपंतप्रधान 1979 बनले. 1980 मध्ये पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून त्यांचे नाव होते पण जनता पार्टीला अपयश आल्याने त्यांचे स्वप्न साकार होऊ शकले नाही. 1981 मध्ये त्यांनी काँग्रेसच जे नावाचा स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला. 6 जुलै 1986 रोजी ते वयाच्या 78 व्यावर्षी रोजी मृत्यू पावले. भारत सरकारने मरणोत्तर त्यांचा 2008 मध्ये भारतरत्न ही पदवी देऊन सन्मान केला. त्यांचा जन्मदिवस भारत सरकार समता दिन म्हणून साजरे करते. दिल्ली येथे असणाऱ्या त्यांच्या मृत्यूस्थळाला समता स्थळ असे म्हटले जाते.
दक्षिण भारतामध्ये बाबु जगजीवन राम यांचे कार्य तितकेसे कोणाला माहित नाही त्यामुळे आपल्या व्याख्यानातून मिथुन मधाळे यांनी बाबू जगजीवन राम यांची संपूर्ण माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून बोलताना निपाणी तालुक्याचे तहसीलदार सुरेश मुंजे यांनी बाबू जगजीवन राम यांचे कार्य व त्यांच्या गौरव मोठा आहे तो आपल्या सामाजिक जीवनात अंगीकारून देश हितासाठी आपण कार्यरत राहावे असा संदेश दिला.
या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते महेश सूर्यवंशी, नगरसेवक रवींद्र श्रीखंडे, सुनिता होनकांबळे, अभिषेक कुंभार,समाज कल्याणचे सर्व अधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.