निपाणी नगरी वृत्तसेवा (19)
निपाणी व ग्रामीण परिसरातील अनेकांचे संसार स्थिर करणारी महात्मा बसवेश्वर संस्थेने यावर्षी तब्बल 10.69 कोटीचा नफा कमावला आहे. प्रामाणिक संचालक मंडळ आणि कर्तबगार कर्मचाऱ्यांमुळे महात्मा बसवेश्वर संस्थेच्या ठेवी रुपये 675 कोटींवर गेल्या आहेत. मार्च अखेर 95.18% टक्के वसुली करून संस्थेला तब्बल 10 कोटी 69 लाखाचा नफा झाल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी यांनी दिली. रविवारी आयोजित संस्थेच्या मागील वर्षाच्या कार्याच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अक्षय तृतीयेचे औचित्य साधत महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संस्थेतर्फे अभिवादन करून अक्षय तृतीयेचे महत्त्व व या महामानवांच्या कार्याचा आढावा संस्थेचे असिस्टंट सीईओ श्री सुरज घोडके यांनी घेत यांच्या कार्यप्रति आपण नतमस्तक असल्याचे सांगितले. या थोर महामानवानी आपणासाठी इतके मोठे योगदान दिले आहे की त्यांची उतराई होणे निव्वळ अशक्य आहे.
पुढे डॉ. कुरबेट्टी म्हणाले, आम्ही सर्व संचालक मंडळाने कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पाहिलेले स्वप्न आज सत्यात उतरत असून या आर्थिक वर्षामध्ये संस्थेचे 27 हजार 89 सभासद, 1 कोटी 54 लाख 44 हजारावर भागभांडवल, 86 कोटींचा राखीव निधी, 675 कोटी रुपयांच्या ठेवी, 494 कोटी रुपयांचे कर्ज वाटप तर 266 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. संस्थेची वार्षिक उलाढाल 4658 कोटी असून 807 कोटी रुपयांचे खेळते भांडवल आहे. संस्थेच्या 35 शाखा कार्यरत असून नवीन 6 शाखांना परवानगी मिळाली आहे. याशिवाय स्वमालकीची 7 कार्यालये आहेत.
सांस्कृतिक केंद्र उभारणीचे काम सुरू असून मुलांच्या संस्कारासाठी ते उपयुक्त ठरणार आहे. संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देऊन तांत्रिक ज्ञान रुजवले जात आहे. आरोग्य विमा योजने अंतर्गत सभासद व कर्मचाऱ्यांना 3.50 कोटीची रक्कम दिली आहे. सामाजिक कार्यासाठी 2 कोटीची मदत केली आहे. लवकरच संस्थेतर्फे शैक्षणिक क्षेत्रात प्रवेश करण्यात येणार असल्याचे डॉ. कुरबेट्टी यांनी सांगितले.
संचालक श्रीकांत परमणे यांनी कोर बँकिंग, विमा सेवा, शाखाविस्तार, ऑडिट वर्ग, कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा, कार्ययोजनांची माहिती दिली. सी.ई.ओ एस. के. आदन्नावर यांनी अहवाल वाचन केले.
बैठकीस अध्यक्ष किशोर बाली, संचालक सुरेश शेट्टी, प्रताप पट्टणशेट्टी, महेश बागेवाडी, अशोक लिगाडे, दिनेश पाटील, राजेश पाटील, सदानंद दुमाले, सदाशिव धनगर, दिनेश पाटील, डॉ. एस. आर. पाटील, संचालिका पुष्पा कुरबेट्टी, विजया शेट्टी, सुवर्णा पट्टणशेट्टी, भद्रेश फुटाणे यांच्यासह संचालक सभासद व कर्मचारी उपस्थित होते. सुरज घोडके यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप गायकवाड यांनी आभार मानले.
शैक्षणिक क्षेत्रात महात्मा बसवेश्वर संस्था योगदान देणार- डॉ सी.बी.कुरबेट्टी..
अवघ्या 35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तब्बल 682 कोटींच्या ठेवी जमवत यशाचा एक महत्त्वाचा टप्पा पार करणारी कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील अग्रगण्य संस्था म्हणजे श्री महात्मा बसवेश्वर होय. या संस्थेने आर्थिक क्षेत्रात निपाणी तालुक्यामध्ये भरीव कामगिरी केली असून अल्पावधीतच ही संस्था आपले कार्यक्षेत्र विस्तारत शैक्षणिक क्षेत्रात प्रवेश करणार असल्याचे काल कुरबेट्टी यांनी सांगितले. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये बसवेश्वर संस्था शैक्षणिक क्षेत्रात देखील मोठे योगदान देणार आहे.