निपाणी नगरी वृत्तसेवा अर्जुननगर (2)
इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीच्या शिक्षणासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने अर्जुननगर येथील देवचंद महाविद्यालयात ब्रिज कोर्सची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. जी. डी. इंगळे यांनी सांगितले की, ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक दरी कमी करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक टप्प्यासाठी आवश्यक असलेले मूलभूत ज्ञान व कौशल्य आत्मसात करण्यास मदत होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रा. सदानंद झळके यांनी महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रा. विनायक कुंभार यांनी कला शाखेतील विविध करिअर संधींचा आढावा घेतला. वाणिज्य विभागाचे प्रमुख श्री. नितीन कोले व प्रा. वैभव पाटील यांनी कॉमर्स शाखेतील संधींबाबत मार्गदर्शन केले. तसेच विज्ञान शाखेचे महत्त्व व त्यातील भविष्याच्या संधींबाबत देखील विद्यार्थ्यांना माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ. एस. पी. जाधव यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. कृष्णामाई कुंभार यांनी केले. आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे पर्यवेक्षक डॉ. मेजर अशोक डोनर यांनी केले.
या उपक्रमास जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री. आशिषभाई शाह, उपाध्यक्षा डॉ. सौ. तृप्तीभाभी शाह व संस्थेचे खजिनदार श्री. सुबोधभाई शाह यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.