निपाणी नगरी वृत्तसेवा (3)
अर्जुननगर : देवचंद कनिष्ठ महाविद्यालयातील जीवशास्त्र विषयाचे व्यासंगी प्राध्यापक मेजर डॉ. अशोक डोणर यांची उपप्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवाकार्याचा हा यथोचित सन्मान मानला जात आहे.
मेजर डॉ. डोनर यांनी गेली 32 वर्षे देवचंद कनिष्ठ महाविद्यालयात अध्यापनाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. आपल्या प्रभावी अध्यापनशैलीमुळे त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये जीवशास्त्र विषयाची आवड निर्माण केली. त्यांच्या मार्गदर्शनातून ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील अनेक विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्राकडे वळले असून आज विविध पदांवर यशस्वीपणे कार्यरत आहेत.
तसेच, त्यांनी गेली २६ वर्षे राष्ट्रीय छात्र सेना (NCC) विभागाचे प्रमुख म्हणून कार्य केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली घडलेले अनेक कॅडेट्स आज भारतीय सैन्यात मेजर, कर्नल, सुभेदार, हवालदार आदी जबाबदारीच्या पदांवर देशसेवा बजावत आहेत. अनेक गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी विनामूल्य मार्गदर्शन करून त्यांचे शैक्षणिक व व्यक्तिमत्त्व विकासाचे कार्य केले आहे. सलग पंधरा वर्षे मुला मुलींच्या वस्तीगृहप्रमुख म्हणून कार्य पाहिले. या कालावधीत कोणतीही समस्या न येता अत्यंत सक्षम पद्धतीने हा विभाग सांभाळला. त्यांच्या कालावधीत मुलींच्या नूतन वसतिगृहाच्या वास्तूची निर्मिती झाली.
पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी महाविद्यालयात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. त्यांच्या समृद्ध अनुभवाचा आणि दूरदृष्टीचा लाभ महाविद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी निश्चितच होणार असून, संस्थेला नव्या उंचीवर नेण्यास त्यांचे नेतृत्व मोलाचे ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
जनता शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी तसेच संस्थेने वेळोवेळी सोपविलेल्या विविध जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत निष्ठेने, शिस्तबद्धतेने व यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची पोचपावती म्हणून त्यांची देवचंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
याप्रसंगी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री. आशिषभाई शाह, उपाध्यक्षा डॉ. सौ. तृप्तीभाभी शाह तसेच संस्थेचे खजिनदार श्री. सुबोधभाई शाह यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.