निपाणी नगरी वृत्तसेवा (31)
अर्जुननगर, : जनता शिक्षण मंडळ संचलित देवचंद महाविद्यालय, अर्जुननगर येथील प्राचार्या प्रो. (डॉ.) जी. डी. इंगळे आणि कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्या सौ. एस. पी. जाधव यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेला सत्कार समारंभ भावनिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. शैक्षणिक क्षेत्रात अनुक्रमे ३६ व ३४ वर्षे उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या या दोन्ही मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ व मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
जनता शिक्षण मंडळाचे विश्वस्त माननीय श्री. प्रकाशभाई शाह यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. डॉ. श्रीधर गोखले, प्रा. पी. एम. जाधव, स्टाफ वेल्फेअर समितीचे प्रमुख प्रा. ए. बी. गुरव, समितीचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि महाविद्यालयातील विविध घटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात श्री. प्रकाशभाई शाह यांनी दोन्ही सत्कारमूर्तींच्या प्रदीर्घ, निष्ठावान आणि समर्पित सेवाकार्याचा गौरव करताना त्यांच्या योगदानामुळे संस्थेच्या शैक्षणिक परंपरेला नवी उंची प्राप्त झाल्याचे सांगितले. सेवानिवृत्तीनंतरचे जीवन आरोग्यदायी, आनंदी आणि समाधानकारक जावो, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
उत्तरपर मनोगतात सौ. एस. पी. जाधव यांनी संस्थापक अध्यक्ष पद्मभूषण स्व. देवचंदजी शाह, स्व. किरणभाई शाह तसेच विद्यमान अध्यक्ष श्री. आशिषभाई शाह यांच्या मार्गदर्शनामुळेच आपल्याला यशस्वीपणे जबाबदाऱ्या पार पाडता आल्याचे नमूद केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा प्रयत्न केला असून विद्यार्थ्यांकडून मिळणारा सन्मान हीच आपल्या कार्याची खरी पावती असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
प्राचार्या प्रो. (डॉ.) जी. डी. इंगळे यांनी संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभल्यामुळेच प्राचार्यपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडता आल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी, संशोधनवृत्तीच्या विकासासाठी आणि महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांचे यश हेच आपल्या सेवाकाळातील सर्वात मोठे समाधान असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी महाविद्यालयातील अनेक शिक्षक वृंदानी आपले मनोगत व्यक्त करत दोन्ही मान्यवरांच्या कार्याचा गौरव केला. विद्यार्थी-केंद्रित दृष्टीकोन, प्रभावी प्रशासन, शिस्तप्रियता आणि सहकार्यशील वृत्तीमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीस मोठी चालना मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात रोपाला जलार्पण करून करण्यात आली. मानपत्राचे वाचन प्रा. सदानंद झळके व प्रा. निशिगंधा चौगुले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शुभांगी गायकवाड व प्रा. निशिगंधा चौगुले यांनी केले, तर आभार प्रा. सचिन खोत यांनी मानले.