निपाणी नगरी वृत्तसेवा (6)
दि फिमेल एज्युकेशन सोसायटी संचलित सौ. भागिरथीबाई शाह कन्याशाळेत 5 जून जागतिक पर्यावरण दिन उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी बोलताना शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका डॉ. सौ. एस. जे. पाटील म्हणाल्या, “आज पर्यावरण संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. अलीकडे वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण, मोठे रस्ते यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. हवा, पाणी, माती यांचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे. याचा मानवी जीवनावर परिणाम झालेला दिसून येतो. जागतिक तापमान वाढीमुळे मानवासह पशु, पक्षी, इतर प्राणी यांचे जगणे असह्य होत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड आवश्यक आहे. प्रत्येकाने एकतरी झाड लावले पाहिजे व वाढविले पाहिजे. झाडांमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो, पावसाचे प्रमाण देखील वाढते.”
यावेळी विज्ञान शिक्षिका सौ. एम. एम. चिकोडे, समिक्षा शिंदे, भूमी यादव यांनीही पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व सांगितले. शालेय परिसरात पर्यावरण संवर्धनाचे फलक घेऊन घोषणा देत रॅली काढण्यात आली. तसेच शालेय परिसरात वृक्षलागवड करण्यात आली. सर्व विद्यार्थी उत्साहात सहभागी झाले. त्यांनी स्वतः विविध प्रकारची रोपे आणून परिसरात लावण्यात आली. यावेळी एम. एम. चिकोडे, एस. आर. इराज, यु. बी. नागावे, ए. डी. पाटील, ए. आर. पाटील, व्ही. ए. निगवे, एस. एस. घाटगे, आर. व्ही. मधाळे, आर. आर. सुतार, पी. आर. पाटील, ओ. एम. कुलकर्णी, सी. एम. बाडकर यांच्यासह सर्व विद्यार्थीनी उपस्थित होत्या.