निपाणी नगरी वृत्तसेवा (21)
मोहनलाल दोशी विद्यालय अर्जुननगर ता.कागल या शाळेतील शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग यश मिळविलेल्या 23 विद्यार्थी, त्यांचे पालक, मुख्याध्यापिका व मार्गदर्शक शिक्षकांचा जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह यांच्या हस्ते मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी मधील पात्र ठरलेल्या ०२ व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी मध्ये पात्र ठरलेल्या २१ विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा मंडळाच्या वतीने सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना आशिष भाई शाह म्हणाले, जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास जीवनाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये उत्तुंग यश मिळवता येते. सीमा भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुला-मुलींना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी जनता शिक्षण मंडळ सातत्याने प्रयत्नशील असून त्या प्रयत्नांना प्रचंड यश मिळत आहे. शिष्यवृत्ती परीक्षेतील यश हे विद्यार्थी शिक्षक व पालक यांनी केलेल्या कठोर परिश्रमाचे फळ आहे. या यशाबद्दल त्यांनी विद्यार्थी शिक्षक व पालक यांचे कौतुक केले. शिष्यवृत्ती परीक्षेचे मार्गदर्शक श्री एस डी तोडकर यांनी आपण त्यांच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवत संस्थेचा नावलौकिक राज्यभर केल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले.
इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात सहावी आलेली कु.जान्हवी दादासाहेब वडगुले, जिल्ह्यात चौथा आलेला अर्णव -हाटवळ, तसेच इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झालेले प्रतीक कदम, शौर्य पाटील,शिवकुमार झळके, साईराज जाधव, ज्ञानेश्वरी पोवार, गिरीजा कुंभार,अर्णव पाटील, शरयू कुंभार, प्राजक्ता कुंभार, गौरी भोसले, श्रावणी यादव, ऋषिराज कदम, प्रीतम गेंगे, आराध्या पाटील, सिराज नदाफ,आन्वीक्षीक कांबळे, पृथ्वीराज दबडे, समर्थ पाटील, प्रांजली दुरडे, काव्यांजली चौगुले, श्रेया कांबळे या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस.एम.गोडबोले यांचाही संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
शिष्यवृत्ती परीक्षेतील मार्गदर्शक श्री एस.डी. तोडकर यांचा आशिषभाई शाह यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर सर्व पालकांनीही श्री तोडकर यांचा विशेष सत्कार करून कौतुक केले.
शिष्यवृत्ती परीक्षेचे मार्गदर्शक व्ही.आर. पाटील, आर.डी. देसाई, पी.एस. सावळवाडे, आर. आर. कपले, डी.बी. बेनाडे, आर बी चव्हाण यांचाही सत्कार करण्यात आला.
प्रारंभी मुख्याध्यापिका श्रीमती एस एम गोडबोले यांनी स्पर्धा परीक्षेसाठी शाळेने घेतलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला तसेच पालकांनीही विद्यार्थी व शाळेला केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना श्री तोडकर यांनी माननीय अध्यक्षानी आपल्यावरती टाकलेला विश्वास मुख्याध्यापिका श्रीमती गोडबोले यांचे मार्गदर्शन पालक आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांचा पाठिंबा यामुळेच हे यश प्राप्त झाल्याचे सांगितले. पालकांच्या वतीने सदानंद झळके यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर मुख्याध्यापिका श्रीमती गोडबोले, शिक्षक प्रतिनिधी श्री एस बी यादव, श्री एस.डी तोडकर , शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी श्री ए.एस. शिरगुप्पे तसेच पालकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीमती व्ही आर पाटील यांनी तर आभार श्री एस बी यादव यांनी मानले.