निपाणी नगरी वृत्तसेवा (प्रतिनिधी)
गुरुपौर्णिमेनिमित्त लिटल एंजल इंग्लिश मीडियम स्कूल, निपाणी येथे भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गुरुपौर्णिमा हा महर्षी वेदव्यास यांच्या जयंतीचा दिवस असून, गुरुंच्या ज्ञान परंपरेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा पवित्र दिवस आहे.
कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन श्री. प्रसन्नकुमार गुजर व त्यांच्या धर्मपत्नी सौ. सीमा गुजर प्रशालेच्या मुख्याध्यापिका फक्रुनिसा मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात महर्षी वेदव्यास परमात्मराज राजीवजी महाराज आदी गुरुजनांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थिनी कु. गुडिया राजपुरोहित व कु. रुही कांबळे यांनी अतिशय आत्मविश्वासपूर्ण व प्रभावी पद्धतीने केले.
यानंतर विद्यार्थ्यांनी गुरुंच्या महत्त्वावर आधारित प्रेरणादायी भाषणे सादर केली. प्रणिता तावदरे तसेच दीपाली खोत यांनी गुरुंचे जीवनातील स्थान, संस्कार आणि शिक्षणाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी चेअरमन श्री. प्रसन्नकुमार गुजर यांनी विद्यार्थ्यांनी गुरुजनांचा आदर राखून ज्ञान, शिस्त आणि संस्कार यांचा अंगीकार करावा, असे प्रेरणादायी विचार व्यक्त केले. संपूर्ण कार्यक्रम भक्ती, आदर आणि कृतज्ञतेच्या वातावरणात पार पडला. गुरुपौर्णिमेच्या या सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गुरुजनां विषयी आदरभाव, भारतीय संस्कृतीची जाणीव आणि संस्कारांची मूल्ये अधिक दृढ झाली. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका फक्रुनिसा मुल्ला सर्व शिक्षक वृंद कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.