निपाणी नगरी वृत्तसेवा..(25)
“पंढरीची वारी आहे माझे घरी…” या अभंगातून विठ्ठल भक्तीचे निरुपण, विविध धार्मिक उपक्रमांनी दिंडीचा प्रवास मंगलमय..
शिरगुपी येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या माघ वारी दिंडीचा शुभारंभ अत्यंत भक्तिमय वातावरणात आज झाला. “पंढरीची वारी आहे माझे घरी, आणिक न करी तीर्थव्रत” या संतवचनांची अनुभूती देणारी ही दिंडी म्हणजे वारकरी संप्रदायातील निष्ठा, साधेपणा आणि विठ्ठल भक्तीचे जिवंत रूप ठरत आहे. वै. ह. भ. प. यशवंत गुंडू हजारे व वै. ह. भ. प. विमल यशवंत हजारे, गुंडू हजारे (पुंडलिक बैल) यांच्या आशीर्वादाने ही दिंडी मार्गस्थ झाली असून, माघवारी दिंडी चालक म्हणून श्री. रविंद्र यशवंत हजारे यांचे नेतृत्व लाभले आहे. दिंडीसाठी चाळीसहून अधिक वारकरी सहभागी झाले आहेत.
या दिंडीचा प्रारंभ २५ जानेवारी रोजी सकाळी विठ्ठल मंदिरापासून झाला. भाविकांच्या सहभागाने दिंडीने आंबा मार्केटपर्यंत पदयात्रा केली. दरम्यान निपाणी नगरपालिके जवळील राजेंद्र भगत यांच्या घरी अल्पोपहर घेऊन दिंडी मार्गस्थ झाली. आजरात्री शिवाजी हुद्दार यांच्या घरी महाप्रसाद व मुक्काम होणार. पुढील दिवशी रेणुका मंदिरात आरतीनंतर संत सेवा मंडळ, तिप्पेहळ्ळी येथे विश्रांती व रात्री वांटबरे येथे आप्पा नाना शिंदे यांचे घरी महाप्रसाद व मुक्काम ठेवण्यात आला होता. दिंडीचा हा प्रवास म्हणजे केवळ चाल नव्हे, तर प्रत्येक टप्प्यावर नामस्मरण, अभंग, भजन व आरतीतून घडणारे आत्मिक चिंतन आहे.
“नाम घेतां विठूचे, होई मन निर्मळ
देहभाव विसरुनी, लागे पंढरीचा ओढ”
या भावार्थाने अभंगांचे निरुपण करताना, दिंडीतील वारकरी विठ्ठलनामात तल्लीन झालेले दिसत आहेत. २७ जानेवारी रोजी पहाटे वाटंबरे येथे काकड आरतीनंतर पुढे विसावा येथे पादुका दर्शन, तर कांतादेवी मठामध्ये शिरगुप्पी दिंडीचे आगमन होणार आहे. त्यानंतर पांडुरंग दर्शन, नगर प्रदक्षिणा, एकादशी निमित्त किर्तन, जागर व महाप्रसाद अशा विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
३० जानेवारी रोजी द्वादशी पहाटे काकड आरती, चंद्रभागेमध्ये स्नान, हरि संतदर्शन व श्रीकृष्ण कांदादेवी मठामध्ये सामुदायिक प्रसाद होणार असून दुपारी पंढरपूरहून परतीचा प्रवास सुरू होईल. रात्री कांटबरे येथे रात्री विश्रांती व पहाटे काकड आरती होईल.
31 जानेवारी रोजी मिरज मध्ये अल्पोपहार त्यानंतर नृसिंहवाडी येथे स्नान व दत्त दर्शन केले जाईल. दुपारी माघ दिंडीचे नृसिंह वाड्यातून प्रस्थान होऊन अक्कोळ कडे रवाना होईल. त्या ठिकाणी प्रसादाचे आयोजन केले असून सर्व वारकरी त्याचा लाभ घेतील. त्यानंतर दिंडी शिरगुपीकडे मार्गस्थ होईल.
अखेर १ फेब्रुवारी रोजी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सामुदायिक अभिषेक, हजारे मळा येथे महाप्रसाद व रात्री हरिपाठ, भजन, कीर्तन सेवेद्वारे दिंडीची सांगता होणार आहे.
ही माघ वारी दिंडी म्हणजे केवळ धार्मिक परंपरा नसून, समता, भक्ती, सेवा आणि एकात्मतेचा संदेश देणारा चालता-वाचता संस्कार आहे. “विठ्ठल विठ्ठल” या नामघोषात ग्रामीण संस्कृतीचा श्वास आणि संतपरंपरेचा वारसा आजही जिवंत असल्याचे दर्शन या दिंडीमधून घडत आहे.