निपाणी नगरी वृत्तसेवा (20)
आज इयत्ता ८वी व ९वीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यास ७२% पालकांची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्या मानसिकता, सवयी आणि भविष्यातील शैक्षणिक वाटचालीबाबत पालकांशी सविस्तर संवाद साधण्यात आला.
शाळेचे मुख्याध्यापक प्रा. ॲड. श्री. डी. डी. हळवणकर यांनी पालकांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांमध्ये अलीकडच्या काळात आढळणाऱ्या Bipolar Disorder, Conduct Disorder, Learning Disorder आणि Attention Deficit/Hyperactivity Disorder (ADHD) यांसारख्या वर्तनात्मक व मानसिक समस्यांबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या वर्तनातील बदलांकडे पालकांनी गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकांनी दररोज किमान १० मिनिटे विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधावा, त्यांच्या शाळेतील अनुभवांबद्दल विचारपूस करावी आणि त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात, असे आवाहन करण्यात आले. तसेच आठवड्यातून किमान एकदा शाळेशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष शाळेत येणे शक्य नसल्यास फोनद्वारे वर्गशिक्षक किंवा मुख्याध्यापकांशी विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत चर्चा करावी, असेही सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांकडून मोबाईलचा वाढता आणि अनियंत्रित वापर हा चिंतेचा विषय असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. काही विद्यार्थी Instagram, Snapchat यांसारख्या ॲप्सचा वापर तसेच Chrome द्वारे विविध संकेतस्थळे उघडत असल्याचे आढळते. काही विद्यार्थी गेमिंग ॲप्स लपवून पालकांच्या अनुपस्थितीत अनेक तास मोबाईलवर गेम खेळतात. या सवयींमुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे मुख्याध्यापकांनी स्पष्ट केले. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांच्या मोबाईल वापरावर योग्य नियंत्रण ठेवावे व त्यांच्या डिजिटल सवयींकडे नियमित लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले.
तसेच इयत्ता ८वी, ९वी आणि १०वी हा विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक जीवनाचा भक्कम पाया आहे. पुढे ११वी-१२वीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर तसेच NEET, JEE यांसारख्या स्पर्धात्मक परीक्षांना सामोरे जाताना मूलभूत संकल्पना स्पष्ट असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे या स्तरावर विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे गांभीर्याने लक्ष देऊन मजबूत शैक्षणिक पाया तयार करावा, असे मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी दिलेल्या सर्व प्रश्नपत्रिका व पेपर त्यांच्या पालकांना दाखविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत पालकांना माहिती देण्यात आली तसेच त्यांच्या शंका व अडचणी जाणून घेण्यात आल्या.
पालक मेळाव्यास व्ही. व्ही. पत्की, एस. डी. साखळकर, जे. आर. खपले, ए. एम. यादव, के. एल. कांबळे, के. एस. देसाई, अर्चना पाटील, पूजा पाटील, प्रियांका पाटील, धनश्री पाटील, एस. बी. चौगले, लेखनिक मुकुंद कोरे आणि रेणुका फराकटे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
पालकांनी शाळेशी सातत्याने संपर्क ठेवून शाळा–पालक–विद्यार्थी यांच्यात समन्वय निर्माण करणे, हीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची गुरुकिल्ली असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.