निपाणी नगरी वृत्तसेवा (20)
अर्जुननगर : डिजिटल युगात विद्यार्थ्यांना आपल्या कला, संस्कृती व समृद्ध लोकपरंपरेची ओळख व्हावी, त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि महाराष्ट्रीय लोककलेचे विविध पैलू प्रत्यक्ष अनुभवता यावेत, या उद्देशाने देवचंद महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने ‘कलाकार आपल्या भेटीला’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरील लोकप्रिय ‘भूपाळी ते भैरवी’ या कार्यक्रमाचे निर्माते-दिग्दर्शक व प्रसिद्ध शाहीर संपत कदम तसेच संगीतकार व ढोलकीवादक संजय घोलप यांनी महाराष्ट्रातील विविध लोककलांचे प्रभावी सादरीकरण केले. गण, काकड आरती, जात्यावरील ओव्या, वासुदेव, पिंगळा, हेळवी, बहुरूपी, कडकलक्ष्मी, धनगरी ओव्या, पोतराज, नंदीबैल, कोळी नृत्य, शायरी, गोंधळ, वाघ्या-मुरळी, कीर्तन, भजन, गवळण, तमाशा, पोवाडा, लावणी आदी लोककलांची सुरेल मेजवानी विद्यार्थ्यांना अनुभवता आली. टाळ-मृदुंग आणि पारंपरिक वाद्यांच्या साथीने सादर झालेल्या या कार्यक्रमाने उपस्थित विद्यार्थ्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. सुमारे तीन तास रंगलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. रमेश साळुंखे यांनी प्रमुख कलाकारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “महाराष्ट्रीय लोककला हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. या लोककला जपणे आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत लोककलांचे योगदान महत्त्वपूर्ण असून, या लोककलांमध्ये आपल्या संस्कृतीचा प्राण सामावलेला आहे. विद्यार्थ्यांना या समृद्ध लोकपरंपरेची ओळख व्हावी, यासाठीच हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख डॉ विजय गायकवाड यांनी केले. या अभिनव उपक्रमासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्रीमान आशिषभाई शाह उपाध्यक्षा डॉ. सौ. तृप्तीभाभी शाह, संस्थेचे खजिनदार सुबोध भाई शहा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाची उपप्राचार्य मेजर डॉ. अशोक डोनर पर्यवेक्षक प्रा. बी.बी वसावे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वय डॉ. पी.डी. शिरगावे सांस्कृतिक विभागाचे प्रमुख नितीन कोले प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, विद्यार्थी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.आसमा बेग यांनी केले तर आभार डॉ एस. ए. जाधव यांनी मानले.